कुंभारगावात १४४ व्या अखंड हरिनाम विणा सप्ताहाचा थाटात प्रारंभ
कुंभारगांव/राजेंद्र पुजारी यांचेकडून पाटण तालुक्यातील मौजे कुंभारगाव येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी व वै. येसूबुवा उर्फ साधू बाबा यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित ऐतिहासिक १४४ व्या अखंड हरिनाम विणा सप्ताहाचा प्रारंभ १ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात होत आहे. १ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत रंगणाऱ्या या सप्ताहाची सुरुवात १ सप्टेंबर रोजी दुपारी ३:५० ते ५:०० या शुभमुहूर्तावर कलश स्थापना करून होणार आहे. सन १८८३ मध्ये वै. येसूबुवा उर्फ साधू बाबा यांनी फलटण येथील ओढ्याच्या काठावर देह ठेवल्यानंतर तत्कालीन ग्रामस्थ आणि वारकऱ्यांनी या एकदिवसीय उत्सवाचे अखंड हरिनाम सप्ताहात रूपांतर केले होते. तेव्हापासून आजतागायत ही अखंड परंपरा श्रद्धेने जपली जात असून यंदा या सप्ताहाचे १४४ वे वर्ष आहे. पूर्वपार चालत आलेल्या नियमांनुसार वै. साधू बाबांचे झेंडेकरी 'कवर बुवा' यांची मानाची पताका उभारल्याशिवाय सप्ताहाची सुरुवात होत नाही. ...