कलेतून कृतज्ञतेचा उत्सव..! संदीप डाकवे यांचा ‘एक अक्षरगणेशा...! स्वच्छतादूतांसाठी’ उपक्रम
तळमावले/वार्ताहर
गणेशोत्सवाचा धार्मिक आनंद जपतानाच समाजातील महत्त्वाच्या घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा एक संवेदनशील व प्रेरणादायी उपक्रम पाटण तालुक्यात साकारत आहे. प्रसिद्ध अक्षरगणेशाकार व शेतीमित्र संदीप डाकवे यांनी यंदाच्या गणेशोत्सवाचे आणि सुपुत्र चि.स्पंदन डाकवे याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘एक अक्षरगणेशा स्वच्छतादूतांसाठी’ ही सामाजिक संकल्पना हाती घेतली आहे.
स्वच्छता ठेवणाऱ्या स्वच्छतादूतांच्या आरोग्य आणि सुरक्षा यासाठी हातभार लावणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून, याद्वारे सफाई कर्मचाऱ्याच्या आयुष्यात सुरक्षेचा प्रकाश पसरवला जाणार आहे.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी गणेशभक्त, नागरिक, भाविक, व्यावसायिक यांनी संदीप डाकवे यांच्याकडून आपल्या आवडीच्या किंवा स्वतःच्या नावाचा कलात्मक ‘अक्षरगणेशा’ रेखाटून घ्यायचा असून त्या बदल्यात रुपये 100 किंवा स्वेच्छेने त्यापटीत मूल्य जमा करायचे आहे. यातून संकलित होणारा संपूर्ण निधी थेट स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मूलभूत गरजांसाठी वापरला जाणार आहे. या निधीतून स्वच्छतादूतांना लागणारे रेनकोट, गमबूट, हँडग्लोव्हज आणि सुरक्षा मास्क असा ‘सुरक्षा संच’ पुरवला जाईल. ज्यामुळे गणेशभक्तांना स्वतःच्या नावाचा कलात्मक अक्षरगणेशा मिळण्यासोबतच एका चांगल्या कार्यात सहभागी झाल्याचे आत्मिक समाधानही लाभणार आहे.
संदीप डाकवे हे गेली 20 वर्षे अक्षरगणेशाची कला जोपासत असून कलेच्या माध्यमातून मदत उभारण्याचे हे त्यांचे 10 वे वर्ष आहे. सन 2017 पासून त्यांनी या उपक्रमाद्वारे हुतात्मा जवान, केरळ पूरग्रस्त, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, इर्शाळवाडी, आपत्तीग्रस्त आणि गरजूंसाठी 1 लाखांपेक्षा जास्त रुपयांची थेट मदत केली आहे. याशिवाय स्पंदन डाकवे याच्या वाढदिवसानिमित्त नाम फाउंडेशन, आर्मी वेल्फेअर, दिव्यांग मुलांचे साहित्य, ऊसतोड कामगारांना दिवाळी कीट आणि पूरग्रस्तांना मदतीद्वारे त्यांनी सातत्याने सामाजिक बांधिलकी जपली आहे.
स्वच्छतादूत पुस्तक, व्यंगचित्रे, कात्रणांचे प्रदर्शन आणि स्वच्छ भारत अभियाना वर 125 पेक्षा जास्त लेख लिहून स्वच्छतेची चळवळ घराघरांत पोहोचवणाऱ्या डाकवे यांच्या या कार्याची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये तीनदा आणि वल्र्ड ग्रेटेस्ट रेकॉर्ड्स’मध्ये दोनदा झाली असून, त्यांना महाराष्ट्र शासनाचे 7 आणि विविध संस्थांचे 90 हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.
यंदाच्या गणेशोत्सवात केवळ धार्मिक आनंद न घेता सामाजिक जबाबदारीचे भान जपण्यासाठी सर्व नागरिक, व्यावसायिक आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या नावाचा सुंदर अक्षरगणेशा मिळवण्यासाठी आणि स्वच्छतादूतांना मदत करण्यासाठी 9764061633 या क्रमांकावर संपर्क साधून नावनोंदणी करावी. उपक्रमाचे मूल्य स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट, बॅंक ऑफ महाराष्ट्र, खाते क्रमांक. 60370976232 आयएफएससी कोड एमएएचबी 0001050 या खात्यात किंवा 9764061633 या क्रमांकावर गुगल पे अथवा फोन पे द्वारे जमा करून या सामाजिक यज्ञात सहभागी व्हावे, असे आवाहन अक्षरगणेशाकार शेतीमित्र संदीप डाकवे यांनी केले आहे.


Comments
Post a Comment