डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा


तळमावले / वार्ताहर:

            पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथे काल (दि. २२) रात्रीच्या सुमारास बिबट्याने थेट घराशेजारील गोठ्यात घुसून शेळ्यांवर भीषण हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात मुंबईहून कायमचे गावी परतलेले बाळू बाबू डाकवे यांनी उदरनिर्वाहासाठी मोठ्या उमेदीने शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला होता. घरात पत्नी इंदूबाई आणि २३ वर्षांची मूकबधिर मुलगी असा परिवार असलेल्या बाळू डाकवे यांच्या कुटुंबाचा गाडा याच शेळ्यांवर अवलंबून होता. मात्र, बिबट्याच्या या हल्ल्यामुळे या गरीब कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन एका रात्रीत हिरावून घेतले गेले असून, केवळ पंचनामे न करता प्रशासनाने त्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.

            रात्रीच्या वेळी बिबट्याने शेडमध्ये प्रवेश करून अक्षरशः धुमाकूळ घातला. या भीषण हल्ल्यात डाकवे यांच्या तीन गाभण शेळ्या आणि एक बोकड फस्त करण्यात आला. दोन शेळ्या अद्याप बेपत्ता असून, सुदैवाने केवळ एकच शेळी जिवंत बचावली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, एका गाभण शेळीच्या पोटातील पिल्लेही बिबट्याने खाल्ल्याने घटनास्थळी अत्यंत विदारक आणि थरारक दृश्य पाहायला मिळाले. मूकबधिर मुलीचे पालनपोषण आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या डाकवे कुटुंबावर या घटनेने मोठा आर्थिक आघात केला आहे.

            घटनेची माहिती मिळताच काळगावचे वनअधिकारी प्रशांत लवटे, भोसगावचे वनपाल रमेश कुंभार आणि पोलीस पाटील गणेश डाकवे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मात्र, प्रशासनाने नियमांवर बोट न ठेवता या गरीब कुटुंबाची परिस्थिती पाहून त्यांना तातडीने आणि जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. एरवी जंगलात चरायला गेलेल्या जनावरांवर होणारे बिबट्याचे हल्ले आता थेट मानवी वस्तीत आणि घराच्या गोठ्यापर्यंत पोहोचल्याने संपूर्ण गावात घबराट निर्माण झाली आहे.

        मानवी वस्तीनजीक बिबट्याचा वाढलेला हा वावर नागरिकांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. अनेक गावांत बिबट्याची डरकाळी नित्याची झाली असून शेतकऱ्यांचे पशुधन मोठ्या प्रमाणावर नष्ट होत आहे. "वनविभागाने केवळ पंचनामे न करता, या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी त्वरित पिंजरा लावावा आणि उदरनिर्वाह उद्ध्वस्त झालेल्या आमच्या कुटुंबाला शासनाकडून भरीव आर्थिक मदत मिळावी," अशी आर्त हाक नुकसानग्रस्त बाळू डाकवे यांनी दिली आहे. वनविभागाने या घटनांकडे वेळीच गांभीर्याने न पाहिल्यास भविष्यात मानवी जिवावर बेतून मोठा अनर्थ घडू शकतो, अशी भीती व्यक्त करत तातडीने व्यापक उपाययोजना आणि पिंजरा लावण्याची मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.

चौकट: नुकसानग्रस्त शेतकऱ्याची आर्त हाक "या परिसरातील गावांमध्ये पाळीव प्राण्यांवर बिबट्याचे हल्ले सातत्याने होत आहेत. यापूर्वी वावर होता, पण पुरावा नव्हता. काल बिबट्याने माझ्या शेळ्यांवर हल्ला करून माझ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधनच उद्ध्वस्त केले आहे. वनविभागाने तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि लोकांमध्ये पसरलेली भीती दूर करावी." - बाळू बाबू डाकवे, डाकेवाडी





Comments

Popular posts from this blog

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान