भगवान जिव्हेश्वर जयंती उत्साहात साजरी
कुंभारगांव/राजेंद्र पुजारी यांचेकडून
कुंभारगाव (ता. पाटण) येथील श्यामसुंदर स्वामी व जीवनस्वामी यांच्या घरी गेल्या अनेक वर्षांपासून श्रावण शुक्ल त्रयोदशीला साजरी केली जाणारी भगवान जिव्हेश्वर जयंती यंदाही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून भगवान जिव्हेश्वराच्या ग्रंथाचे पारायण करण्यात आले. सोमवार 24 ऑगस्ट, 2026 रोजी सायंकाळी लक्ष्मीदेवी भजनी मंडळ यांचा जागर आणि भजन पार पडले. त्यानंतर 25 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 6 वाजून 23 मिनिटांनी भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सव सोहळा पार पडला. यावेळी कुंभारगाव आणि तळमावले परिसरातील स्वकुळ साळी समाज बांधव मोठ्याा संख्येने उपस्थित होते.
भगवान जिव्हेश्वर हे साळी समाजाचे आद्य दैवत मानले जाते. भगवान शंकराच्या जिभेतून त्यांचा जन्म झाला, म्हणून त्यांना जिव्हेश्वर असे म्हटले जाते, अशी आख्यायिका आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावण शुक्ल त्रयोदशीला समाज बांधवांच्या हस्ते भगवान जिव्हेश्वरांना अभिषेक, पूजा आणि आरती करण्यात आली. या जयंतीनिमित्त श्यामसुंदर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व धार्मिक विधी पार पडले.
सकाळी 8 ते 11 या वेळेत ज्ञानराज भजनी मंडळ (तळमावले) व नाईकबा भजनी मंडळ (गलमेवाडी) यांचे भजन झाले. भजनानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हा उत्सव यशस्वी करण्यासाठी साळी समाजातील तरुण आणि युवक वर्गाने विशेष परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment