ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर ढेबेवाडीत पोलिसांचा भव्य रूट मार्च


ढेबेवाडी (प्रतिनिधी): मुस्लिम बांधवांच्या पवित्र ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि सण शांततेत पार पडावा, यासाठी ढेबेवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने कडक पोलीस बंदोबस्तात ढेबेवाडी बाजारपेठ व परिसरात भव्य रूट मार्च काढण्यात आला. ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. प्रवीण दाईगडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च पार पडला.

सदर रूट मार्च ढेबेवाडी पोलीस ठाण्यातून सुरू होऊन पुढे ग्रामीण रुग्णालय, राऊत चौक, मातने दुकान, झेंडा चौक ते यशोदा मार्केट, मंद्रूळकोळे या मुख्य मार्गांवरून काढण्यात आला. २६ ऑगस्ट रोजी साजरा होत असलेल्या ईद-ए-मिलाद सणाच्या अनुषंगाने नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी आणि सर्व व्यवहार सुरळीत चालावेत, हा या पथसंचलनाचा मुख्य उद्देश होता.

या रूट मार्चमध्ये १ पोलीस अधिकारी, ९ पोलीस अंमलदार (ज्यात १ साध्या वेषातील अंमलदार व १ ट्रॅफिक अंमलदार समाविष्ट), १७ होमगार्ड जवान तसेच २ चारचाकी आणि १ दुचाकी वाहनांचा ताफा सहभागी झाला होता. सण-उत्सवाच्या काळात सर्वांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून ईद-ए-मिलादचा सण उत्साहात व सामाजिक सलोख्याने साजरा करावा, असे आवाहन ढेबेवाडी पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग