कुंभारगावात १४४ व्या अखंड हरिनाम विणा सप्ताहाचा थाटात प्रारंभ


कुंभारगांव/राजेंद्र पुजारी यांचेकडून

                पाटण तालुक्यातील मौजे कुंभारगाव येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी व वै. येसूबुवा उर्फ साधू बाबा यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित ऐतिहासिक १४४ व्या अखंड हरिनाम विणा सप्ताहाचा प्रारंभ १ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात होत आहे. १ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत रंगणाऱ्या या सप्ताहाची सुरुवात १ सप्टेंबर रोजी दुपारी ३:५० ते ५:०० या शुभमुहूर्तावर कलश स्थापना करून होणार आहे. 

                सन १८८३ मध्ये वै. येसूबुवा उर्फ साधू बाबा यांनी फलटण येथील ओढ्याच्या काठावर देह ठेवल्यानंतर तत्कालीन ग्रामस्थ आणि वारकऱ्यांनी या एकदिवसीय उत्सवाचे अखंड हरिनाम सप्ताहात रूपांतर केले होते. तेव्हापासून आजतागायत ही अखंड परंपरा श्रद्धेने जपली जात असून यंदा या सप्ताहाचे १४४ वे वर्ष आहे. पूर्वपार चालत आलेल्या नियमांनुसार वै. साधू बाबांचे झेंडेकरी 'कवर बुवा' यांची मानाची पताका उभारल्याशिवाय सप्ताहाची सुरुवात होत नाही. 

            या संपूर्ण सप्ताहात २४ तास अखंड विणा पहारा दिला जात असून दररोज रात्री ९ ते ११ या वेळेत स्थानिक भजनी मंडळांची भावपूर्ण भजन सेवा पार पडणार आहे. तसेच पूर्वीपासून चालत आलेली अन्नदात्यांची 'संत पंगत' ही परंपरा आजही तशीच सुरू आहे. सप्ताहाची सांगता ८ सप्टेंबर रोजी गोपाळकाला व दहीहंडीने होणार असून, दहीहंडीचा मुख्य मान पारंपरिक नियमानुसार कवर बुवांच्या घराण्याकडेच आहे. या संपूर्ण सोहळ्यात कुंभारगाव आणि परिसरातील ग्रामस्थ, भाविक भक्त व वारकऱ्यांचा मोठा सहभाग असतो. 

            या अखंड हरिनाम विणा सप्ताहातील सर्व धार्मिक कार्यक्रमांचा आणि महाप्रसादाचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा, असे आवाहन उत्सव समिती व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग