तळमावले येथील ‘शिवसमर्थ’मध्ये श्रावण महिन्यात ‘श्री चिंतामणी’ ग्रंथाचे वाचन

तळमावले (वार्ताहर):

सध्याच्या डिजिटल आणि सोशल मीडियाच्या युगात वाचन संस्कृती तसेच आपल्या पारंपरिक रुढी-परंपरा हळूहळू लोप पावत असताना, तळमावले येथील ‘द शिवसमर्थ मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी’ आणि परिवाराच्या वतीने एक स्तुत्य व आदर्श उपक्रम राबवला जात आहे. गेल्या पाच वर्षांपासून शिवसमर्थ परिवाराने श्रावण महिन्यात ग्रंथ वाचनाची सुंदर परंपरा निरंतर जपली असून, यंदाच्या श्रावण महिन्यात संस्थेच्या मुख्य कार्यालयात ‘श्री चिंतामणी’ या ग्रंथाचे अत्यंत भाविक वातावरणात वाचन सुरू आहे.

नवीन पिढीला आपल्या समृद्ध वाचन संस्कृतीची ओळख व्हावी आणि आपल्या धार्मिक रुढी-परंपरांचे ज्ञान व्हावे, या उदात्त हेतूने शिवसमर्थ समुहाचे कुटुंबप्रमुख ॲड. जनार्दन बोत्रे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा उपक्रम अविरतपणे चालवला जात आहे.

यंदा श्रावण महिन्याचे औचित्य साधून संस्थेच्या मुख्य कार्यालयात दररोज सायंकाळी ५:३० ते ६:३० या वेळेत ग्रंथवाचनाचा कार्यक्रम होतो. स्वतः धार्मिक व सांस्कृतिक परंपरांची जपणूक करणारे ॲड. जनार्दन बोत्रे यांच्यासमवेत या वाचनात संस्थेचे सल्लागार, संचालक, अधिकारी आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहतो. विशेष म्हणजे, केवळ अधिकाऱ्यांपुरते मर्यादित न ठेवता मुख्य कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आणि तरुण वर्गालाही या ग्रंथातील अध्यायांचे वाचन करण्याची संधी दिली जात आहे. यामुळे तरुण कर्मचाऱ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन त्यांचे लक्ष अध्यात्माकडे आणि ग्रंथसंस्कृतीकडे वेधले जात आहे.

केवळ आर्थिक सेवा देण्यापुरते मर्यादित न राहता सामाजिक आणि सांस्कृतिक बांधिलकी जपणे हे शिवसमर्थचे वैशिष्ट्य राहिले आहे. ग्रंथवाचनाच्या या उपक्रमासोबतच पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणे, प्रत्येक एकादशीला मुख्य कार्यालय व विविध शाखांमध्ये भजनाचे कार्यक्रम आयोजित करणे, कर्मचाऱ्यांमध्ये संगीताची व अध्यात्माची आवड निर्माण व्हावी म्हणून संगीत विद्यालय चालवणे यांसारखे उपक्रम संस्था नियमित राबवते. याशिवाय परिसरातील यात्रा, भंडारे, अखंड हरिनाम सप्ताह आणि मंदिर जीर्णोद्धार अशा अनेक आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यात शिवसमर्थ संस्था नेहमीच हिरिरीने सहभागी होत असते. शिवसमर्थ परिवाराच्या या सातत्यपूर्ण आणि संस्कृतीरक्षक उपक्रमाचे संपूर्ण परिसरातून जोरदार कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग