लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कृपा-आशीर्वादाने ४५ वर्षांनंतर देसाई परिवाराचा जिल्हा बँकेत प्रवेश – मंत्री शंभूराज देसाई
सातारा/प्रतिनिधी
लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या कृपा-आशीर्वादाने तब्बल ४५ वर्षांनंतर देसाई परिवाराचा सदस्य जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळात दाखल झाला आहे. देसाई गटाचे दोन संचालक बँकेत निवडून आल्याने मनापासून आनंद आणि अभिमान वाटत असल्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, “माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व सन्माननीय मतदार बंधू-भगिनींचे सर्वप्रथम मी आभार मानतो. निवडणूक लागल्यापासून माझ्या सहकारी कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी जी मेहनत घेतली, ठामपणे साथ दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. अनेक बाजूंनी प्रयत्न झाले. कोणत्याही गोष्टीला न जुमानता देसाई परिवारावर विश्वास ठेवून मतदारांनी आम्हाला साथ दिली.”
“स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांनी स्थापन केलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पहिले अध्यक्षही तेच होते. त्यांच्या पश्चात आज इतक्या वर्षांनंतर देसाई परिवाराचा सदस्य बँकेत दाखल झाला आहे. स्वर्गीय शिवाजीराव देसाई साहेबांनंतर जवळपास ४५ वर्षांनी आम्ही जिल्हा बँकेत प्रवेश केला आहे. केवळ एकटा सदस्य नव्हे, तर आमच्या गटाच्या मंगल पाटील याही बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. पहिल्यांदाच देसाई गटाचे दोन संचालक बँकेत दाखल झाले आहेत. महिला संचालकाच्या रूपानेही बँकेत प्रतिनिधित्व मिळाले आहे. मान-सन्मानाने आणि अभिमानाने आम्ही बँकेत प्रवेश केला असून, याचा आम्हा सर्वांना मनापासून आनंद आहे.”
“माझ्यासाठी मेहनत घेणाऱ्या, कष्ट करणाऱ्या आणि कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता देसाई परिवारावर ठाम विश्वास ठेवून मतदान करणाऱ्या सर्व मतदार बंधू-भगिनींचे तसेच देसाई गटाच्या कार्यकर्त्यांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार मानतो,” असे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
Comments
Post a Comment