पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग
कुंभारगांव/राजेंद्र पुजारी यांचेकडून
गावचा विकास हा केवळ शासकीय योजनांवरच अवलंबून न राहता ग्रामस्थांची एकजूट, सामूहिक सहभाग आणि श्रमदानातूनही कसा साध्य होऊ शकतो, याचे प्रेरणादायी उदाहरण पाटण तालुक्यातील कुंभारगाव येथील पोतेकरवाडी येथे पाहायला मिळत आहे. येथे ग्रामस्थांच्या एकजुटीतून नवीन श्रीराम मंदिराची उभारणी होत असून, त्यासाठी सुमारे २० गुंठे जागा सामूहिक सहभागातून उपलब्ध करण्यात आली आहे.
या प्रस्तावित मंदिरापर्यंत सुलभतेने पोहोचण्यासाठी सुमारे १७ फूट रुंदीचा रस्ता तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. या कामात ग्रामस्थ, महिला मंडळ, नवतरुण मंडळ व बालमित्र मंडळाने उत्स्फूर्त सहभाग घेत स्वतः श्रमदान केले असून, गावाच्या विकासासाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे. या संपूर्ण उपक्रमामागे माजी सैनिक सुभेदार मेजर प्रकाश गंगाराम पोतेकर यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेली 'श्रीराम मंदिर व ग्रामविकास समिती' आणि समस्त ग्रामस्थांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. माजी सैनिक म्हणून शिस्त, संघभावना आणि राष्ट्रसेवेची भावना त्यांनी गावाच्या विकासकार्यातही प्रत्यक्ष उतरवली आहे.
पोतेकरवाडी ग्रामस्थांची ही एकजूट, श्रमदानातून सुरू असलेले रस्त्याचे काम आणि मंदिर उभारणीचा संकल्प याची माहिती मिळाल्यानंतर सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय श्री. संतोष पाटील साहेब, प्रांताधिकारी व तहसीलदार अनंत गुरव यांनी आवर्जून पोतेकरवाडीला भेट देऊन सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली.
यावेळी युवा नेते माननीय श्री. सुरज चव्हाण (कै. डॉ. दिलीपराव चव्हाण यांचे चिरंजीव) यांनी जिल्हाधिकारी माननीय श्री. संतोष पाटील यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या प्रसंगी पाटणचे तहसीलदार अनंत गुरव, सर्कल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी बी. व्ही. गायकवाड, पोलीस पाटील अमित शिंदे, अमोल गायकवाड, प्रसाद कांबळे, विक्रम वरेकर आणि सौ. वैशाली चव्हाण आदी उपस्थित होते. मान्यवरांनी ग्रामस्थांच्या या स्वयंस्फूर्त उपक्रमाचे भरभरून कौतुक केले तसेच श्रीराम मंदिर व ग्रामविकास समिती, माजी सैनिक सुभेदार मेजर प्रकाश पोतेकर, पदाधिकारी, महिला व श्रमदान करणाऱ्या सर्वांचे विशेष अभिनंदन केले.
गावातील प्रत्येक घटकाने कोणताही भेदभाव न ठेवता “गावाचा विकास हा सर्वांचा विकास” या भावनेने एकत्र येऊन काम करण्याचा घेतलेला निर्णय पोतेकरवाडीची विशेष ओळख ठरत आहे. मंदिर उभारणीसोबतच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी काळातही विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. माजी सैनिक सुभेदार मेजर प्रकाश गंगाराम पोतेकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी दाखवलेली ही एकजूट आणि श्रमदानाची भावना परिसरातील इतर गावांसाठीही मोठी प्रेरणादायी ठरत आहे. “एकजूट, श्रमदान आणि सामूहिक सहभागातून आपल्या गावाचा विकास” हा संदेश देत पोतेकरवाडीने विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.
कुंभारगाव तालुका पाटण येथील पोतेकरवाडी गावाचा विकास हा केवळ शासकीय योजनांमधूनच नव्हे तर ग्रामस्थांची एकजूट सामूहिक सहभाग आणि श्रमदानाच्या माध्यमातूनही साध्य होऊ शकतो याचे प्रेरणादायी उदाहरण कुंभारगावच्या पोतेकर वाडी येथे पाहायला मिळत आहे,
- जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील साहेब
Comments
Post a Comment