श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान
२० व्या वर्षात पदार्पण; भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण
तळमावले/राजेंद्र पुजारी यांचेकडून
वै. येसूबुवा उर्फ साधुबाबा आणि वै. तातुबुवा कव्हरमहाराज (झेंडेकरी) यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या श्री क्षेत्र कुंभारगाव येथून दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे हे २० वे वर्ष असून, शुक्रवार दिनांक १० जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता वै. येसूबुवा व वै. तातुबुवा यांच्या समाधी मंदिर कुंभारगाव येथून या सोहळ्याचे थाटात प्रस्थान होईल.
वै.येसू बुवा उर्फ साधू बाबा आणि वै.तातू बुवा कवर महाराज (झेंडेकरी) यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या भूमीतून त्यांच्या प्रेरणेतून सण २०४ साली कुंभारगाव ते कोळे घाडगेबाबा मंदिर लोटांगण घेतले होते. त्यावेळी ह.भ.प.कै.बाळासो चव्हाण, भीमराव बुरसे, पांडुरंग उरुणकर, जगन्नाथ देसाई (दादा), संपतराव पुजारी, सुरेंद्र देसाई, संभाजीराव देसाई (बापू) नारायण सावेकर, वसंतराव चव्हाण, प्रकाश देसाई, उत्तम तवटे, विठ्ठल माटेकर(दाजी), शिवाजी कुंभार, बबन कुंभार, बाबा करपे, पंचक्रोशीतील भजनी मंडळ, ग्रामस्थ आदींनी लोटांगण दिंडीसाठी परिश्रम घेतले होते. याच प्रेरणेतून सन 2007 साली कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याला दिंडी चालक ह, भ, प, यशवंत महाराज कुंभारगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात झाली यंदा विसाव्या वर्षी प्रस्थान होत आहे.
प्रस्थानानंतर कुंभारगाव नगरप्रदक्षिणा पूर्ण करून सायंकाळी ६ वाजता ह.भ.प. रघुनाथ (दादा) महाराज गलमेवाडी यांचे कीर्तन होणार आहे. या दिंडीचे नेतृत्व दिंडी चालक ह.भ.प. यशवंत महाराज कुंभारगाव आणि विणेकरी ह.भ.प. आनंदराव सुर्वे करणार आहेत.
हा पायी दिंडी सोहळा शुक्रवार १० जुलै ते रविवार २६ जुलै २०२६ (आषाढ शु.११/१२) या कालावधीत चालणार आहे. प्रवासादरम्यान कोळे, विंग, कराड, वाघेरी, शामगाव, राजाचे कुर्ले, पुसेसावळी, औंध, वडूज, गोंदवले, शिंगणापूर, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, वाखरी अशा विविध गावांमधून मुक्काम करत आणि संतांच्या जयघोषात हा सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होईल. ठिकठिकाणच्या अन्नदात्यांकडून भाविकांच्या नाष्टा व भोजनाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
रविवार दि. २६ जुलै रोजी द्वादशी निमित्त संतपंगत ग्रामस्थ मंडळ गलमेवाडी यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. कुंभारगाव आणि पंचक्रोशीतील सर्व भावीक भक्तांनी या पायी दिंडी सोहळ्यामध्ये तन-मन-धनाने सहभागी होऊन परमार्थाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उत्तमराव तवटे आणि समस्त दिंडी सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment