प्रस्तुती रजेचा निर्णय स्वागतार्ह; वेतनवाढ व बोनससाठी स्वराज्य संघटनेचा पाठपुरावा सुरूच – संतोष कदम
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत मे. डी. एस. इंटरप्रायजेसमार्फत कार्यरत बाह्यस्रोत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या लढ्याला महत्त्वपूर्ण टप्पा मिळाला आहे. कर्मचाऱ्यांची प्रस्तुती रजा मान्य झाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, किमान वेतनवाढ, दिवाळी बोनस (सानुग्रह अनुदान) आणि इतर प्रलंबित मागण्यांबाबत अद्याप अंतिम निर्णय होणे आवश्यक आहे.
यासंदर्भात स्वराज्य संघटनेचे युवक अध्यक्ष संतोष कदम म्हणाले की, प्रस्तुती रजेचा निर्णय हा कामगारांच्या लढ्याला मिळालेला महत्त्वाचा टप्पा आहे. मात्र, सर्व कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा प्रत्यक्ष लाभ मिळणे आणि इतर प्रलंबित मागण्यांची अंमलबजावणी होणे तितकेच महत्त्वाचे आहे.
कंत्राटी आरोग्य कर्मचारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आरोग्य सेवा देण्याचे काम करतात. त्यांच्या वेतनवाढीचा आणि दिवाळी बोनसचा प्रश्नही तातडीने मार्गी लागणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांच्या सर्व न्याय्य मागण्यांची कायमस्वरूपी सोडवणूक होईपर्यंत स्वराज्य संघटनेचा प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा सुरूच राहील, असेही संतोष कदम यांनी स्पष्ट केले.
Comments
Post a Comment