स्वच्छता दूत म्हणजे आपल्या कुटुंबाचे आरोग्य जपणारे खरे डॉक्टर’ : दादासोा शिंगण


तळमावले/राजेंद्र पुजारी यांचेकडून

            आजकाल मुलांच्या वाढदिवसाला मोठे बॅनर्स, डीजे आणि अफाट बडेजाव केला जातो. परंतु, आपल्या 12 वर्षांच्या मुलाच्या वाढदिवशी स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून संपूर्ण परिसराचे आरोग्य निरोगी ठेवणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना ‘डॉक्टर’ मानून त्यांचा सन्मान करणारा संदीप डाकवे यांच्यासारखा बाप मी पहिल्यांदाच पाहिला आहे. कष्टाळू आणि रस्त्यावरच्या माणसाच्या चेहऱ्यावर आनंद आणणे हाच खऱ्या अर्थाने वाढदिवसाचा सर्वोत्तम आशीर्वाद आहे, असे गौरवोद्गार मलकापूर नगरपरिषदेचे नगरसेवक दादासोा शिंगण यांनी काढले. 

            ‘वाढदिवस आपल्या स्पंदनचा, संदेश सामाजिक बांधिलकीचा’ या उदात्त हेतूने प्रेरित होऊन डाकवे परिवाराच्या वतीने चि.स्पंदन रेश्मा संदीप डाकवे याच्या 12 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘स्वच्छता योद्धा सन्मान’ सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. चालू वर्षातील दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवत अनावश्यक खर्च टाळून स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट व डाकवे परिवाराने हा समाजोपयोगी उपक्रम प्रत्यक्षात आणला.

            या कार्यक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कुठलाही भपका, भव्य व्यासपीठ किंवा स्टेज न उभारता थेट रस्त्यावर उतरून हा सत्कार करण्यात आला. सैदापूरच्या घरोघरी जाऊन कचरा गोळा करणारे घंटागाडी चालक दीपक प्रकाश रास्ते, मार्तंड अरुण रास्ते, अमीर सलीम मुल्ला, बाळू हंबीरराव पाटसुपे व यासीन कादर तांबोळी यांना मान्यवरांच्या हस्ते स्वच्छता योद्धा प्रमाणपत्र, स्वच्छतादूत पुस्तक आणि आरोग्य-स्वच्छता साहित्य किट देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी दादासो शिंगण यांनी सांगितले की, घरोघरी जाऊन कचरा गोळा करणारी मंडळी हीच खरी ‘डॉक्टर’ आहेत, जी आपले घर आणि परिसर स्वच्छ व निरोगी ठेवतात. अशा कर्मचाऱ्यांचा सत्कार करणे म्हणजे एका अर्थाने संपूर्ण सैदापूरवासीयांचाच सन्मान करण्यासारखा आहे. रस्त्यावर आपले आरोग्य धोक्यात घालून दुसऱ्यांचा विचार करणाऱ्या या व्यक्तींचा सत्कार करताना आम्हाला प्रचंड आनंद होत आहे.

            विशाल पाटील यांनी डॉ.संदीप डाकवे यांच्या या उपक्रमाचे कौतुक करताना पुढे म्हटले, जगात कोणताही बाप आपल्या मुलाच्या वाढदिवसाला असा अनोखा विचार करत नाही. बॅनर्स-डिजेच्या पलिकडे जाऊन मुलाला समाजासाठी जगायला शिकवणारा आणि ‘समाज म्हणजे आपण आणि आपणच जनता आहोत’ हा पाठ शिकवणारा असा बाप विरळाच! या बालवयात स्पंदनला मिळालेले हे सामाजिक जाणिवांचे बाळकडू कौतुकास्पद आहे. अडचणीच्या वेळी दुसऱ्याला मदत करण्यात जे सुख असते, तीच खरी पुण्याई असते.

            या प्रसंगी मलकापूर नगरपरिषदेचे दादासाहेब शिंगण, पत्रकार विशाल पाटील, पत्रकार सागर दंडवते, जयंत कदम, गुलाब जाधव, संदीप डाकवे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. दादासाहेब शिंगण हे असे लोकप्रतिनिधी आहेत जे वॉर्डात घाण साचल्यास नगरसेवक म्हणून नव्हे तर एक जबाबदार नागरिक म्हणून स्वतः नाल्यात उतरून स्वच्छता करतात. अशा खऱ्याखुऱ्या स्वच्छतादूताच्या हस्ते सैदापूरच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान झाल्याने सोहळयाचे महत्त्व आणखीनच वाढले.

            यंदाच्या गणेशोत्सवात स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या ‘एक अक्षरगणेशा स्वच्छतादूतांसाठी’ या उपक्रमातून जमा झालेली रक्कम आणि डाकवे परिवाराचे आर्थिक योगदान याद्वारे हा स्तुत्य उपक्रम आकारास आला. यापूर्वीही डाकवे परिवाराने नाम फौंडेशन, आर्मी वेल्फेअर फंड, दिव्यांग मुले, इर्शाळवाडी पूरग्रस्त आणि गरजूंना वैद्यकीय व शैक्षणिक मदत करून आपली सामाजिक प्रतिबद्धता सिद्ध केली आहे.

        कार्यक्रमाच्या शेवटी, उपस्थित मान्यवरांनी चि. स्पंदन यास उदंड आयुष्याच्या आणि उत्तम आरोग्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या, तसेच सैदापूरचे आरोग्य सुदृढ ठेवणाऱ्या सर्व स्वच्छतादूतांच्या अतुलनीय कार्याला मानाचा मुजरा केला.

Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान