ढेबेवाडीत केबल वायर व लोखंडी सळई चोरी करणारी टोळी जेरबंद
ढेबेवाडी :
शेतकऱ्यांच्या शेतातील केबल वायर तसेच बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडी सळया चोरी करणाऱ्या टोळी ढेबेवाडी पोलिसांनी जेरबंद केली असून, या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून एकूण ३ लाख १ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि. ४ सप्टेंबर रोजी रात्री मौजे बाचोली, ता. पाटण येथे वांग नदीवरील नवीन पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणाहून बांधकाम साहित्य चोरीला गेले होते. तसेच बांधकाम साइटवरील केबलची चोरी करण्यात आली होती. याबाबत ढेबेवाडी पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच पोलिसानी अवघ्या दोन तासांत दोन आरोपींना ताब्यात घेतले. पुढील तपासात आणखी चार आरोपी निष्पन्न झाले असून त्यांनाही अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नवे पुढील प्रमाणे सुनील मोहन कदम (रा. कदमआवाड, मुदळकोळे, ता. पाटण), क्षितीज ऊर्फ ओंकार शिवाजी साठे (रा. सणबूर, ता. पाटण), शुभम विठ्ठल गुरव (रा. बाचोली, ता. पाटण), पवन वसंत गुरव (रा. येलूर, ता. वाळवा, जि. सांगली), ओंकार सुभाष निकम (रा. बाचोली, ता. पाटण) आणि निखील नथुराम थोरात (रा. भोसगाव, ता. पाटण).
पोलिसांनी आरोपींकडून ३२ हजार ४०० रुपये किमतीच्या ५४० किलो लोखंडी सळया, १४ हजार रुपये किमतीच्या १४ लोखंडी प्लेट, २ लाख रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा पिकअप गाडी आणि ५५ हजार रुपये किमतीची ५०० मीटर लांबीची कॉपर केबल वायर, असा एकूण ३ लाख १ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईत ढेबेवाडी पोलिस ठाण्याच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या सूचनेनुसार उपविभागीय पोलिस अधिकारी सुदाम पाचोरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण दाईगडे, पोलिस उपनिरीक्षक इंद्रजित चव्हाण तसेच पोलिस कर्मचारी प्रशांत चव्हाण, प्रशांत माने, सौरभ कांबळे, माणिक पाटील आणि संकेत पाटील यांनी ही कारवाई केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस हवालदार धिरजकुमार मुळे करीत आहेत.
Comments
Post a Comment