‘बाप्पा तुझ्याचसाठी’मधून कराडच्या मातीतून बाप्पाला अनोखी मानवंदना

कराड, दि. 8 : सूर्याशक्ती प्रोडक्शनच्या वतीने कराड परिसरात चित्रित केलेल्या 'बाप्पा तुझ्याचसाठी' या गाण्याचा लॉन्चिंग 10 सप्टेंबर रोजी कराडच्या टाऊन हॉल येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर या गाण्यातील मुख्य कलाकार व कराडची कन्या असलेली अभिनेत्री अश्विनी चवरे यांनी आज याबाबत माहिती दिली. या गाण्यात चवरे यांच्यासह अंकित मोहन व अन्य कलाकारांसह कराडच्या ढोल ताशा पथकातील शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला आहे.

कराडच्या मातीत शूट झालेलं बाप्पाचं विशेष गाणं ‘बाप्पा तुझ्याचसाठी’ येत्या १० सप्टेंबर रोजी रसिकांच्या भेटीला येत आहे. सूर्या शक्ती प्रस्तुत या गाण्याच्या माध्यमातून गणरायाची भक्ती आणि महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचं प्रतीक असलेल्या ढोल-ताशा पथकाच्या जोशपूर्ण परंपरेची भव्य सांगड घालण्यात आल्याची माहिती अभिनेत्री अश्विनी चवरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले आहे.
गणेशोत्सव म्हटलं की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घुमणारा ढोल-ताशांचा नाद, त्यातून निर्माण होणारी ऊर्जा आणि बाप्पाच्या आगमनाचा जल्लोष हे समीकरण अविभाज्य आहे. याच भावनेला केंद्रस्थानी ठेवत ‘बाप्पा तुझ्याचसाठी’ हे गाणं साकारण्यात आलं आहे. ढोल-ताशा पथकातील कलाकारांची मेहनत, शिस्त, एकजूट आणि बाप्पावरील श्रद्धेला या गाण्यात विशेष स्थान देण्यात आलं आहे.
या गाण्यात कराडच्या ‘जगदंब ढोल ताशा ध्वज पथक (ट्रस्ट)’ यांचे विशेष योगदान आहे. गणेशोत्सवातील ढोल-ताशा पथकांची भूमिका केवळ बाप्पाच्या आगमनाचा जल्लोष करण्यापुरती मर्यादित नसून, त्यामागे असलेली शिस्त, सातत्यपूर्ण सराव, सामूहिक ऊर्जा आणि गणरायाप्रती असलेली निस्सीम भक्ती या सगळ्याचं दर्शन या गाण्यातून घडणार आहे. पथकाचे संस्थापक सचिव महेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या या पथकाच्या सहभागामुळे गाण्याला कराडच्या गणेशोत्सवाचा अस्सल सांस्कृतिक बाज लाभला आहे.
या गाण्यात अभिनेते अंकित मोहन प्रमुख भूमिकेत दिसणार असून, या गाण्याचं आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे कराडची कन्या आणि नामवंत अभिनेत्री अश्विनी चवरे. कराडशी असलेलं तिचं जिव्हाळ्याचं नातं आणि याच भूमीत झालेलं गाण्याचं चित्रीकरण यामुळे ‘बाप्पा तुझ्याचसाठी’ हे गाणं तिच्यासाठीही खास ठरलं आहे.
अश्विनी चवरे हिने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्येही आपल्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘जिलबी’, ‘मी पाठीशी आहे’ आणि ‘After Operation Landon Café’ यांसारख्या चित्रपटांमधून तिने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. आता आपल्या जन्मभूमीच्या मातीत साकारलेल्या या बाप्पाच्या गाण्याच्या माध्यमातून ती प्रेक्षकांसमोर एका वेगळ्या रूपात दिसणार आहे.
अश्विनी चवरे आणि सूर्या तोरसे यांनी या गाण्याची निर्मिती केली असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गाण्याचं चित्रीकरण कराड शहर आणि परिसरातील विविध नयनरम्य व सांस्कृतिक ठिकाणी करण्यात आलं आहे. त्यामुळे कराडची माती, तिथली संस्कृती आणि गणेशोत्सवाचा उत्साह या गाण्यातून ठळकपणे अनुभवायला मिळणार आहे.
‘बाप्पा तुझ्याचसाठी’ला लाभला आहे महाराष्ट्राचा लाडका आणि दमदार आवाज, इंडियन आयडल विजेता चैतन्य देवडे. ‘माऊली’ या नावानेही रसिकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या चैतन्य देवडे यांच्या बुलंद आणि भावस्पर्शी आवाजातून बाप्पाची भक्ती अधिक प्रभावीपणे रसिकांपर्यंत पोहोचणार आहे.
गाण्याला संगीताची भव्यता दिली आहे सुप्रसिद्ध संगीतकार देवदत्त बाजी यांनी. ‘शेर शिवाजी’, ‘सुभेदार’, ‘बाजी’ यांसह अनेक गाजलेल्या चित्रपटांना संगीत देणाऱ्या देवदत्त बाजी यांच्या संगीतामुळे ‘बाप्पा तुझ्याचसाठी’ या गाण्याला भक्ती, जोश आणि महाराष्ट्राच्या मातीचा खास बाज लाभला आहे. गाण्याचं दिग्दर्शन चंद्रकांत लता गायकवाड यांनी केलं आहे.
‘बाप्पा तुझ्याचसाठी’ या बहुचर्चित गाण्याचा भव्य प्रीमियर आणि लॉन्चिंग सोहळा कराडमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला गाण्यातील कलाकार आणि निर्माते यांच्यासह महाराष्ट्राचे लाडके अभिनेते अंकित मोहन तसेच इतर दिग्गज कलाकारांची उपस्थिती लाभणार आहे. यावेळी चैतन्य देवडे यांच्या विशेष लाईव्ह परफॉर्मन्सची मेजवानीही अनुभवता येणार आहे.
कराडच्या मातीत साकारलेलं हे गाणं केवळ गणरायाला अर्पण केलेलं भक्तिगीत नसून, महाराष्ट्राच्या ढोल-ताशा संस्कृतीला, त्या परंपरेला जपणाऱ्या कलाकारांना आणि कराडच्या मातीला सलाम करणारा एक सांस्कृतिक उत्सव आहे.

Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग