गांजणी माशीच्या पोळ्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कुंभारगांव/राजेंद्र पुजारी यांचेकडून

कुंभारगाव, ता. पाटण येथील मुख्य बाजारतळ व रहदारीच्या ठिकाणी असलेल्या एका आंब्याच्या झाडावर गांजणी माशीचे (डंकारी मधमाशांचे) पोळे तयार झाले आहे. दिवसेंदिवस या पोळ्याचा आकार वाढत चालला असून, यामध्ये हजारो माशा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे पोळे अत्यंत धोकादायक स्वरूप धारण करत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

या वाढत्या धोक्याची प्रचिती आजच आली असून, दोघा व्यक्तींच्या हात आणि गुढघ्यावर गांजणी माशीने डंख केला. त्यांना तातडीने तळमावले येथील डॉ. ताईगडे यांच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले; प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र, या पोळ्यातील माशांनी सामूहिक हल्ला केल्यास माणसाच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती जाणकार नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

ज्या ठिकाणी हे पोळे तयार झाले आहे, त्या परिसरात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडी, पशुवैद्यकीय दवाखाना, मंदिर आणि आठवडी बाजार भरण्याची जागा आहे. यामुळे या मार्गावरून शालेय विद्यार्थी, लहान मुले, महिला, भाविक आणि बाजारकरूंची सतत वर्दळ असते. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन हे पोळे त्वरित काढावे, अशी तीव्र मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

या गंभीर प्रकारची माहिती मिळताच ढेबेवाडी वनविभागाचे वनरक्षक शरद टाले आणि वनकर्मचारी वामन साळुंखे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हे पोळे रेस्क्यू टीमच्या माध्यमातून काढण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पाहता लवकरात लवकर हे पोळे सुरक्षितरीत्या हटवले जावे, अशी जोरदार मागणी नागरिक करत आहेत.



Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान