अण्णा, तुमची अशी अचानक एक्झिट चटका लावून गेली...
रामचंद्र पांडुरंग डाकवे... आमचे सर्वांचे 'अण्णा'! काल अचानक तुमच्या निधनाची बातमी कानावर आली आणि काळजाचा ठोकाच चुकला. तुमची ही अशी अचानक एक्झिट मनाला भयंकर चटका लावून गेली आहे. डोळे मिटले की जुन्या आठवणींचा एक अख्खापटच डोळ्यांसमोरून तरळून जातोय.
सन २०१२ ते २०१६ चा तो काळ... मी मुंबईत होतो. जुन्या हनुमान गल्लीतील तो रस्ता आणि तिथे कष्टाचे डोंगर उपसणारे तुम्ही आजही मला लख्ख आठवतात. मुंबईसारख्या मायावी शहरात, हमालीसारख्या हाडाची काडं करणाऱ्या कामात तुम्ही स्वतःला अक्षरशः झोकून दिलं होतं. अत्यंत मितभाषी, कष्टाळू आणि स्वतःच्याच विश्वात हरवलेला तुमचा तो स्वभाव. वरून एखादा कडक, राकट आणि कठोर वाटणारा माणूस, पण आतून मात्र अगदी मेणासारखा मऊ! वात्सल्याचा एक शांत झरा तुमच्या आत वाहत असायचा. त्यावेळी मुंबईच्या त्या धावपळीत तुमच्याशी खूप काही बोलता आलं नाही, पण तुमचे ते कष्टकरी हात खूप काही सांगून जायचे.
कालांतराने जबाबदाऱ्या पार पडल्या. मुलींची, मुलाची लग्ने झाली आणि मुंबईचा तो धकाधकीचा रामरामोकून तुम्ही गावाकडच्या मातीत परतलात. तिथंही शांत बसला नाहीत, तर शेतीच्या कामात स्वतःला पुन्हा एकदा राबवून घेतलं.
अण्णा, सगळ्यात जास्त आठवण येते ती तुमच्या त्या पितृप्रेमाची. तुमचा मुलगा विकास... ज्याच्या आवाजात एक दैवी जादू आहे. शाळेत असल्यापासून मी त्याच्या त्या आवाजावर फिदा आहे, म्हणूनच त्याला मी आदराने 'अध्यक्ष' म्हणतो. तो मुंबईवरून आपल्या घामाचे पैसे गावी पाठवताना माझ्याकडे द्यायचा आणि मी ते तुमच्या घरी आणून द्यायचो. कधी कामाच्या नादात मी विसरायचो, पण तुम्ही घरी आलात की त्या राकट चेहऱ्यामागे लपलेला एक काळजी करणारा बाप हळूच विचारायचा, "नाना... विकासने काय दिलंय का?"
इतर वेळी आपल्यात फारशा गप्पा व्हायच्या नाहीत, पण तुमच्या त्या वागण्यातून, त्या एका प्रश्नातून मला तुमच्याबद्दल नेहमीच आदर वाटला. सतत कष्ट करण्याची तुमची ती वृत्ती आणि कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारं तुमचं ते अथांग प्रेम, या सर्व गोष्टी मनावर कायमच्या कोरल्या गेल्या आहेत.
आज मन जास्त यासाठी तुटतंय कारण, आता कुठे विकास मुंबईत स्वतःचे पंख पसरून स्थिरावण्याचा प्रयत्न करत होता. स्वतःच्या पायावर उभं राहून आकाशाला गवसणी घालण्याची स्वप्ने तो पाहत आहे. आज त्याला त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप देणाऱ्या तुमच्या त्या राकट हातांची आणि तुमच्या भक्कम आधाराची सर्वात जास्त गरज होती. आणि नेमक्या याच वळणावर तुम्ही त्याला, कुटुंबाला असं अचानक पोरकं करून निघून गेलात. ही अतिशय दुर्दैवी आणि काळीज पिळवटून टाकणारी बाब आहे.
तुमच्या अशा अचानक जाण्याने डाकवे कुटुंबाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. एका वटवृक्षाची सावली अचानक हरपली आहे. अण्णा, या दुःखातून सावरण्याची, हे आभाळ कोसळलेले असताना उभे राहण्याची ताकद ईश्वराने विकासला आणि संपूर्ण कुटुंबाला देवो, हीच प्रार्थना...!
- संदीप डाकवे
संपादक, सा.स्पंदन एक्सप्रेस

Comments
Post a Comment