सा. 'स्पंदन एक्सप्रेस'तर्फे घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन
तळमावले (वार्ताहर):
कराड येथून नियमितपणे प्रसिद्ध होत असलेल्या सा. 'स्पंदन एक्सप्रेस'तर्फे घरगुती गणपती सजावट करणाऱ्या रसिकांसाठी 'स्पंदन पर्यावरणस्नेही-गणेश सन्मान २०२६' ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. बाप्पाची आरास आणि निसर्गाची जपणूक यांचा सुंदर मेळ घालणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे.
निसर्गाचा समतोल राखून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेशभक्तांसाठी या स्पर्धेत सोपे निकष ठेवण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने पर्यावरणपूरक मूर्तीची निवड, सजावटीमध्ये प्लॅस्टिक व थर्माकोलचा शून्य वापर आणि अधिकाधिक नैसर्गिक व पुनर्रवापर योग्य साहित्याचा वापर करणे आवश्यक आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळणार असून, सर्व स्पर्धकांच्या सजावटीची माहिती आणि छायाचित्रे सा.'स्पंदन एक्सप्रेस'मध्ये प्रसिद्ध केली जातील. उत्कृष्ट सजावट करणाऱ्या विजेत्यांना साप्ताहिकाच्या मुख्य पानावरील मानाचे स्थान आणि 'स्पंदन एक्सप्रेस' या युट्यूब चॅनेलवर विशेष प्रसिद्धी दिली जाईल. तसेच, प्रत्येक सहभागीला 'पर्यावरण रक्षक ई-प्रमाणपत्र' दिले जाईल व विजेत्यांना आकर्षक रोप, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येईल.
या आकर्षक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी केवळ २०० रुपये स्पर्धा शुल्क ठेवले आहे. स्पर्धकांनी आपले संपूर्ण नाव, पत्ता, सजावटीचे दोन स्पष्ट फोटो, एक मिनिटाचा व्हिडिओ आणि आपल्या सामाजिक किंवा पर्यावरणपूरक संकल्पनेची थोडक्यात माहिती संपादक डॉ.संदीप डाकवे यांच्या 9764061633 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवणे आवश्यक आहे.
पर्यावरणाचा संदेश देत लाडक्या बाप्पाची सेवा करण्याची ही संधी अजिबात सोडू नका. अर्ज करण्याची अंतिम तारीख शुक्रवार, 18 सप्टेंबर, 2026 ही आहे, त्यामुळे आजच सहभाग नोंदवून आपल्या सृजनशीलतेला हक्काची दाद मिळवा..!
Comments
Post a Comment