स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे बोधचिन्ह भारताच्या टपाल तिकिटावर....!
तळमावले (प्रतिनिधी):
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथील 'स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य' या संस्थेने सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील आपल्या उत्तुंग कार्याची परंपरा कायम राखत आणखी एक ऐतिहासिक यश संपादन केले आहे. भारतीय टपाल विभागाच्या (India Post) अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘माय स्टॅम्प’ (My Stamp) योजनेअंतर्गत स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे अधिकृत बोधचिन्ह (लोगो) आता भारताच्या अधिकृत टपाल तिकिटावर मुद्रित करण्यात आले आहे. ग्रामीण भागातून उगम पावलेल्या एखाद्या सामाजिक संस्थेचे बोधचिन्ह थेट भारतीय टपाल तिकिटावर झळकण्याची ही अत्यंत अभिमानास्पद आणि कौतुकास्पद गोष्ट ठरली आहे.
विशेष म्हणजे, भारतीय टपाल खात्याच्या फिलाटेली ब्युरो, पुणे (Philately Bureau Pune H.O. 411001) कडून जारी करण्यात आलेल्या या विशेष ५ रुपयांच्या (₹5.00) टपाल तिकिटाच्या शीटवर मुंबईतील प्रसिद्ध ‘श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर, प्रभादेवी’ चे छायाचित्र असून, त्याच्या जोडीला स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे बोधचिन्ह आणि 'वसा सामाजिक बांधिलकीचा' हे ब्रीदवाक्य अत्यंत आकर्षकरीत्या मुद्रित करण्यात आले आहे. हे टपाल तिकीट केवळ सन्मानचिन्ह नसून, ते देशभरात अधिकृत पत्रव्यवहारासाठी वैध टपाल मूल्य म्हणून वापरले जाणार आहे.
सन २०१४ पासून ‘वसा सामाजिक बांधिलकीचा’ हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून, संस्थापक डॉ. संदीप डाकवे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या ट्रस्टने सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य आणि शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांत संपूर्ण महाराष्ट्रभर शेकडो नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. लोकसहभागातून राबवलेल्या या सर्व उपक्रमांना समाजातून नेहमीच उदंड प्रतिसाद लाभला आहे.
काही दिवसांपूर्वीच स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टला ISO 9001:2015 हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानांकन प्राप्त झाले असून, ट्रस्टच्या पारदर्शक व गुणवत्तापूर्ण कारभारावर मोहोर उमटली होती. तसेच सुप्रसिद्ध पार्श्वगायिका कविता राम यांच्या आवाजातील 'स्पंदन गौरव गीत' देखील नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या पाठोपाठ आता टपाल खात्याच्या ‘माय स्टॅम्प’ योजनेअंतर्गत संस्थेचा लोगो टपाल तिकिटावर छापल्यामुळे ट्रस्टच्या शिरपेचात आणखी एक सुवर्णमय तुरा रोवला गेला आहे.
स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या उल्लेखनीय समाजकार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासन व सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक) यांच्यावतीने संस्थेला यापूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार आणि सेवाव्रती पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
भारतीय टपाल खात्याकडून मिळालेल्या या राष्ट्रीय स्तरावरील बहुमानामुळे स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, डाकेवाडीचे ग्रामस्थ आणि हितचिंतकांमध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण पसरले आहे. या सन्मानामुळे भविष्यात अधिक जोमाने समाजकार्य करण्यासाठी नवीन ऊर्जा व बळ मिळाल्याची भावना संस्थापक डॉ. संदीप डाकवे यांनी व्यक्त केली आहे.
Comments
Post a Comment