कराडमध्ये ३० लाखांची मोबाईल चोरी उघडकीस



कराड/अनिल देसाई यांचेकडून 

कराड शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या एका मोबाईल शॉपीचे शटर तोडून तब्बल ३० लाख रुपये किमतीचे नवीन मोबाईल फोन लांबवणाऱ्या अंतरराज्यीय टोळीचा कराड शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत बंगलोर (कर्नाटक) येथून दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या असून, न्यायालयाने त्यांना ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

२१ ऑगस्टच्या रात्री घडली होती घटना २१ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री २:०० वाजण्याच्या सुमारास फेडरल बँकेशेजारील मोबाईल शॉपीचे शटर तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला होता. दुकानातील सुमारे ३० लाख रुपयांचे नवीन मोबाईल चोरून चोरटे पसार झाले होते. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून (गु.र.नं. १००८/२०२६; BNS कलम ३०५, ३०५(अ), ३३१(४), ३(५)) तपास सुरू करण्यात आला होता.

२५० CCTV कॅमेरे अन् तांत्रिक विश्लेषण तपासादरम्यान घटनास्थळावरील CCTV फुटेजवरून संशयित स्विफ्ट गाडी शामगाव घाट मार्गे गेल्याचे स्पष्ट झाले. तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखा व कराड शहर पोलिसांच्या 'डी.बी.' पथकाची दोन विशेष पथके तयार करण्यात आली. या पथकाने शामगाव घाट ते अहिल्यानगर दरम्यान सुमारे २०० ते २५० CCTV कॅमेऱ्यांची तपासणी केली. CDR आणि SDR च्या तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांनी टोलनाके चुकवून प्रवास करणाऱ्या या चाणाक्ष टोळीचा माग काढला.

कर्नाटक, आंध्र मार्गे गुन्ह्याचा सूत्रधार तपासात ही टोळी हरियाणा व राजस्थानमधील अभिलेखावरील (रेकॉर्डवरील) गुन्हेगारांची असल्याचे समोर आले. महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातून उत्तर भारतात माल वाहून नेणाऱ्या ट्रकचालक साथीदारांमार्फत त्यांनी आधी कराडमधील दुकानाची रेकी केली. चोरीचा मुद्देमाल ट्रकमध्ये भरून आरोपी हरियाणाला गेले आणि पुन्हा २७ ऑगस्ट रोजी माल भरून कर्नाटकच्या दिशेने आले.

बंगलोरमधून दोन आरोपींना अटक कराड पोलिसांच्या पथकाने ३० ऑगस्ट रोजी कर्नाटकाकडे कूच केले आणि ३१ ऑगस्ट २०२६ रोजी हॉसकोटे (जि. बंगलोर, कर्नाटक) येथून दोन आरोपींना ताब्यात घेतले: १) अब्दुलहाय बशीरअहमद (वय ५१, रा. बावला, ता. तावडू, जि. नूह मेवात, हरियाणा) २) अलाऊदीन जहरुद्दीन (वय ३१, रा. नेहलाहंडा, ता. जेवर, जि. गौतम बुद्ध नगर, उत्तर प्रदेश)

कोर्टात हजर केले असता न्यायाधीशांनी आरोपींना ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. तसेच तपासाचे एक पथक सध्या हरियाणा व राजस्थान येथे रवाना झाले असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय गोडसे करत आहेत.

मार्गदर्शन व कारवाई पथक ही यशस्वी कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, LCB पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके आणि कराड शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विजय गोडसे, सपोनि रोहित फारणे, पोउनि निखिल मगदूम, पोउनि परितोष दातीर व त्यांच्या पथकाने केली.

Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग