मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व भव्य कलश मिरवणूक माटेकरवाडीत मोठ्या उत्साहात संपन्न

कुंभारगांव : राजेंद्र पुजारी यांचेकडून

                कुंभारगाव (ता. पाटण) येथील माटेकरवाडी येथे शंभू महादेव शिवलिंग, नंदी, श्री पार्वती माता, श्री गणेश, श्री हनुमान आणि श्री स्वामी समर्थ यांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा, तसेच नवनिर्मित सभामंडपाचा संयुक्त लोकार्पण सोहळा १६ आणि १७ ऑगस्ट २०२६ या दोन दिवसांत अत्यंत मंगलमय व उत्साही वातावरणात संपन्न झाला.

            सोहळ्याच्या पहिल्या दिवशी, रविवारी दुपारी २ वाजता कुंभारगाव येथील ग्रामदैवत श्री लक्ष्मी अंबाबाई मंदिरापासून माटेकरवाडीपर्यंत (सुमारे २ कि.मी.) भव्य मिरवणूक काढण्यात आली. तुतारीचा निनाद, टाळ-मृदंगाचा गजर आणि महिलांनी डोक्यावर घेतलेली तुळस व पाण्याचे कलश यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. या मिरवणुकीत 'श्रीराम वारकरी शिक्षण संस्था, आरेवाडी'च्या विद्यार्थ्यांनी ज्ञानोबा-तुकाराम व ज्ञानेश्वर माऊलींच्या गजरात अप्रतिम गोल रिंगण पूर्ण केले. सायंकाळी जलाधिवास, धान्याधिवास व शयनाधिवास विधी पार पडल्यानंतर रात्री झी टॉकीज फेम ह.भ.प. श्री सागर पवार यांची रसाळ कीर्तन सेवा आणि स्नेहभोजन झाले.

                दुसऱ्या दिवशी, सोमवारी सकाळी गणेश पूजन, पुण्याहवाचन, होम-हवन आणि अभिषेक विधी पार पडले. दुपारी ४ वाजता श्री.ष.ब्र.प्र.१०८ ज्ञानराज पद्म भास्कर राष्ट्रसंत डॉ. निळकंठ शिवाचार्य धारेश्वर (महास्वामीजी) व श्री बालयोगी आदिराज बाबा शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते शिवलिंग, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण विधी पार पडला. याप्रसंगी धारेश्वर मठाचे गुरु डॉ. निळकंठ शिवाचार्य व श्री बालयोगी आदिराज बाबा यांनी उपस्थितांना शंभू महादेवाचे महत्त्व विशद करून मार्गदर्शन केले. याप्रसंगी श्री- अशोक परशुराम माटेकर (विभाग प्रमुख), सौ.अश्विनी अशोक माटेकर (नगरसेविका मुंबई महानगर पालिका) उपस्थित होते.

            महाआरतीनंतर सर्व उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला परिसरातील भाविक, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नीटनेटके नियोजन शिवशक्ती गणेश मंडळ व ग्रामस्थ मंडळ, माटेकरवाडी (ता. पाटण) यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग