डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती व राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा
मुंबई प्रतिनिधी - गणेश तळेकर
दि. १२ ऑगस्ट २०२६ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग येथील मध्यवर्ती ग्रंथालयाच्या वतीने पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती व राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११.३० वाजता झाली. श्रीमती स्वप्नाली यमगेकर (प्रलेखाकार) यांनी सूत्रसंचालन करत उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व उपस्थित मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना करताना ग्रंथालयाचा मुख्य उद्देश वाचकांना आवश्यक माहिती व पुस्तके सहज उपलब्ध करून देणे हा असावा, असा विचार त्यांनी मांडला. ग्रंथालय हे केवळ पुस्तकांचे संग्रहस्थान नसून ज्ञान, शिक्षण व संशोधनाचे महत्त्वाचे केंद्र आहे, हे त्यांनी स्पष्ट केले.
यानंतर श्री. सागर पाटील (ग्रंथपाल) यांनी पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जीवन व कार्याचा परिचय करून दिला. डॉ. रंगनाथन यांनी भारतीय ग्रंथालय क्षेत्राच्या विकासासाठी दिलेले योगदान, ग्रंथालयशास्त्रातील त्यांचे कार्य आणि त्यांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व यावर त्यांनी प्रकाश टाकला.
यावेळी ग्रंथालय समिती अध्यक्ष डॉ. श्रुती ढाले मॅडम यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करताना डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी मांडलेल्या ग्रंथालयशास्त्राच्या पाच नियमांचे सविस्तर विवेचन केले. त्यांनी या पाच नियमांचे ग्रंथालय सेवा, वाचकाभिमुखता आणि ज्ञानाचा प्रभावी प्रसार यातील महत्त्व स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात मा. डॉ. पूर्वा पाटील मॅडम, अधिष्ठाता यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या ग्रंथालय क्षेत्रातील कार्याचा गौरव केला. वैद्यकीय शिक्षण व संशोधनामध्ये ग्रंथालयाचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करत त्यांनी विद्यार्थ्यांनी अद्ययावत ज्ञान मिळविण्यासाठी ग्रंथालयाचा अधिकाधिक उपयोग करावा, तसेच ग्रंथालयाच्या विकासासाठी व विद्यार्थ्यांना आवश्यक त्या ग्रंथालयीन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. गणेश दराडे (ग्रंथसूचिकार) यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, ग्रंथालयीन कर्मचारी, विद्यार्थी तसेच शिक्षेकत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment