सायबर फसवणूक आणि वाहतूक नियमांबाबत ढेबेवाडी पोलिसांचे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन- गणेश किर्वे
ढेबेवाडी : सध्याच्या डिजिटल युगात मोबाईलचा वाढता वापर आणि ऑनलाईन व्यवहारांमुळे सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी गणेश किर्वे यांनी केले आहे. ते तळमावले येथील दि शिवसमर्थ मल्टी. को. आॅप. क्रे. सोसा. लि; तळमावले च्या मुख्य कार्यालयात कर्मचारी आणि अधिकारी वर्गांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसमर्थ चे सीइओ हेमंत तुपे, सरपंच सुरज चक्के आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
ओवाढते सायबर गुन्हे आणि रस्ते अपघात रोखण्यासाठी त्यांनी नागरिकांना अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तांत्रिक मार्गदर्शन केले. युपीआय (UPI) द्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज असून व्हॉट्सॲप किंवा साध्या मेसेजवर येणाऱ्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये किंवा त्यावरून अज्ञात ॲप्स डाऊनलोड करू नयेत. सुरक्षेचा उपाय म्हणून नागरिकांनी मोबाईलच्या फाईल मॅनेजरमध्ये जाऊन 'APK' सर्च करावे आणि कोणतीही अनोळखी फाईल आढळल्यास ती तत्काळ डिलीट करावी. यासोबतच क्रोम ब्राउझरच्या सेटिंगमध्ये जाऊन 'Third-party cookies' ब्लॉक करावेत आणि अनावश्यक लिंक्स व डेटा डिलीट करावा, जेणेकरून फसवणुकीचा धोका कमी होईल.
आपले जीमेल अकाउंट अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रोफाईलमध्ये जाऊन 'Security & sign-in' पर्यायाचा वापर करावा. तेथे अनोळखी डिव्हाईसवरील सेशन्स लॉगआउट करून फक्त स्वतःचे सेशन चालू ठेवावे. तसेच 'Enhanced safe browsing' ऑन ठेवावे आणि थर्ड पार्टी ॲप्सला दिलेले ॲक्सेस काढून टाकावेत. आपला डेटा चोरीला गेला आहे की नाही, हे तपासण्यासाठी 'Have I Been Pwned' या सुविधेचा वापर करण्याबाबतही पोलिसांनी माहिती दिली. याचबरोबर, सायबर धोके टाळण्यासाठी लहान मुलांच्या हाती मोबाईल देताना पालकांनी विशेष सतर्क राहावे, असा सल्लाही यावेळी देण्यात आला.
सायबर सुरक्षेसोबतच वाहतूक नियमांबाबतही पोलिसांनी कडक भूमिका मांडली आहे. रस्त्यावरून वाहने चालवताना प्रत्येकाने स्वतःसाठी व इतरांच्या सुरक्षेसाठी शिस्तीचे आणि ट्रॅफिकच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. प्रत्येक वाहनाचा थर्ड पार्टी विमा असणे अत्यंत गरजेचे असून, विमा नसल्यास अपघाताच्या वेळी कोणताही क्लेम मिळणार नाही. वाहन चालवताना स्वतःचा ड्रायव्हिंग लायसन्स सोबत ठेवावा आणि शासनाच्या नियमानुसार सर्व वाहनांवर 'HSRP' नंबर प्लेट बसवणे अनिवार्य आहे. अनेकदा पालक कौतुकापोटी आपल्या लहान मुलांना गाडी चालवण्यास देतात, मात्र यापुढे अल्पवयीन मुलांच्या हाती गाडी दिल्यास आणि काही अनुचित प्रकार घडल्यास थेट पालकांनाच आरोपी केले जाईल, असा कडक इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. आपल्या निष्काळजीपणामुळे रस्त्यावरील इतर नागरिकांना नाहक त्रास होऊ नये, याची जबाबदारी प्रत्येकाने घ्यावी, असे आवाहन गणेश किर्वे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment