लाल मातीचा अष्टपैलू पैलवान हरपला: ‘जे. पी. नाना’ यांच्या आठवणींना भावपूर्ण उजाळा


कराड आणि पाटण तालुक्याच्या कुस्तीच्या मैदानांवर ज्यांच्या नावाची डरकाळी घुमायची, कबड्डी आणि व्हॉलीबॉलच्या पटावर ज्यांची चपळाई भल्याभल्यांना अचंबित करायची, आणि ज्यांनी आपल्या क्रीडा कौशल्याने कुंभारगावचा झेंडा पंचक्रोशीत उंच फडकावला, असे जुन्या काळातील अष्टपैलू खेळाडू, प्रगतशील शेतकरी कै. जगन्नाथ परशराम चव्हाण (जे. पी. नाना) यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने पाटण तालुक्याच्या क्रीडा आणि सामाजिक क्षेत्राची न भरून निघणारी हानी झाली आहे.

एका काळात ग्रामीण भागातील क्रीडा संस्कृती जिवंत ठेवण्याचे काम जे. पी. नाना आणि त्यांच्या सवंगड्यांनी केले. कै. बाळसुआण्णा, बाबाबुवा, संपतराव पुजारी, वामन आण्णा या आपल्या जिगरी मित्रांच्या साथीने त्यांनी कुंभारगावला क्रीडा क्षेत्रात एक वेगळी आणि मानाची ओळख मिळवून दिली. कराड आणि पाटण तालुक्यातील विविध यात्रांमधील कुस्ती फडांमध्ये त्यांच्या अस्सल डावांचा आणि ताकदीचा दरारा असायचा. लाल मातीशी जोडलेले हे नाते त्यांनी आयुष्यभर अत्यंत निष्ठेने जपले. केवळ कुस्तीच नाही, तर कबड्डीच्या मैदानात हुकमाचा एक्का असणारे आणि व्हॉलीबॉलच्या खेळात अतिशय पारंगत असणारे जे. पी. नाना खऱ्या अर्थाने अष्टपैलू खेळाडू वृत्तीचे उत्तम उदाहरण होते.

खेळाच्या मैदानाप्रमाणेच त्यांनी आयुष्याच्या मैदानातही एक यशस्वी इनिंग खेळली. शेतीमध्ये जुन्या अनुभवांची आणि नवीन तंत्राची जोड देत त्यांनी एक प्रगतशील शेतकरी म्हणून नावलौकिक मिळवला. त्यांचे मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व, ज्येष्ठांचा आदर करण्याची वृत्ती आणि तरुणांना खेळासाठी दिलेले प्रोत्साहन यांमुळे 'जे. पी. नाना' हे नाव संपूर्ण परिसरात आदराने घेतले जात असे.

अशा या समृद्ध जीवनप्रवासाची २० जुलै रोजी सायंकाळी राहत्या घरी वृद्धापकाळाने सांगता झाली. त्यांच्या निधनाची बातमी समजताच कुंभारगावसह परिसरात शोककळा पसरली. त्याच दिवशी रात्री ९:४५ वाजता वैकुंठधाम, कुंभारगाव येथे शोकाकुल वातावरणात आणि उपस्थितांच्या अश्रूंच्या साक्षीत त्यांच्यावर अंतिम अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांचे रक्षाविसर्जन बुधवार, दिनांक २२ जुलै २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजता वैकुंठधाम, कुंभारगाव (ता. पाटण) येथे होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुली, सुना आणि नातवंडे असा मोठा आणि संपन्न परिवार आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि चव्हाण परिवारास या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, हीच भावपूर्ण प्रार्थना! अष्टपैलू क्रीडापटू आणि अभ्यासू शेतकरी 'जे. पी. नाना' यांच्या स्मृतीस विनम्र श्रद्धांजली!

शब्दांकन : राजेंद्र पुजारी, कुंभारगांव

Comments

Popular posts from this blog

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

अक्षरप्रेमींचा गौरव..! राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार जाहीर

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न