शिवसमर्थ परिवारातर्फे जनसेवकाचा सन्मान
गृह रक्षक दलाचे पलटण नायक श्री. शंकर यशवंत देसाई यांचा सत्कार
शिवसमर्थ परिवाराच्या सामाजिक बांधिलकीचा आणखी एक आदर्श नमुना म्हणून गृह रक्षक दलाचे पलटण नायक श्री. शंकर यशवंत देसाई यांच्या सेवानिवृत्ती निमित्त भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. समाजातील कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक व जनसेवेसाठी आयुष्य वेचलेल्या व्यक्तींचा गौरव करण्याची परंपरा शिवसमर्थ परिवाराने सातत्याने जपली असून, त्याच परंपरेचा भाग म्हणून हा सोहळा उत्साहात पार पडला.
उपस्थितांनी श्री. देसाई यांच्या सेवाकार्याचा गौरव करताना शिवसमर्थ परिवाराच्या समाजाभिमुख उपक्रमांचेही विशेष कौतुक केले. सामाजिक, शैक्षणिक, सहकार आणि जनकल्याणाच्या क्षेत्रात शिवसमर्थ परिवाराने उभे केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.
समाजातील चांगल्या कार्याचा सन्मान व्हावा, सेवाभावी व्यक्तींना प्रोत्साहन मिळावे आणि नव्या पिढीसमोर आदर्श निर्माण व्हावा या उद्देशाने शिवसमर्थ परिवार सातत्याने विविध उपक्रम राबवत असून, हा सत्कार त्याच विचारसरणीचे प्रतीक ठरला.
श्री. शंकर यशवंत देसाई यांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभाची निमंत्रण पत्रिका देण्यासाठी शिवसमर्थ परिवाराचे अध्यक्ष मा. श्री. बोत्रे साहेब यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी एक विशेष आठवण सांगितली. ते म्हणाले की, तरुणपणापासूनच त्यांना गृह रक्षक दलाविषयी विशेष आकर्षण होते. होमगार्डमध्ये सहभागी होऊन देश व समाजसेवेचे कार्य करण्याची त्यांची प्रबळ इच्छा होती. गृह रक्षक दलाची शिस्त, सेवाभाव आणि संकटकाळात जनतेच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहण्याची परंपरा याबद्दल त्यांना विशेष आदर वाटत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
या प्रसंगी केंद्रनायक वरांडे साहेब, सातारा जिल्हा होमगार्ड समादेशक अमोल मोटे, तालुका समादेशक अधिकारी अमोल जंगम, कारकून अधिकारी हेमंत थोरात, पलटण अधिकारी दिलीप भोसले, पश्चिम महाराष्ट्रातील शैक्षणिक व सामाजिक कार्यकर्ते अक्षय चव्हाण, शिवसमर्थ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, तळमावले यांचे प्रतिनिधी विक्रम निकम, कराड नगरपरिषदेचे सफाई कर्मचारी सचिन भोसले तसेच सुमारे २०० पुरुष व महिला होमगार्ड जवान उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री. शंकर यशवंत देसाई यांच्या ३५ वर्षांच्या कर्तव्यनिष्ठ सेवेला सलाम करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सत्काराला उपस्थित सर्वांच्या वतीने शिवसमर्थ परिवारातर्फे श्री. शंकर यशवंत देसाई व त्यांच्या पत्नी सौ. साधना शंकर देसाई यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Comments
Post a Comment