डाकेवाडीत पर्यावरणपूरक वटपौर्णिमा; अनिल डाकवे अन् विकास जाधव यांच्याकडून 100 वडाच्या रोपांचे वाटप
तळमावले/वार्ताहर
वटपौर्णिमेचे औचित्य साधून पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) या गावामध्ये एक अनोखा आणि स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. गावातील अनिल डाकवे आणि विकास जाधव यांनी एकत्र येत गावातील महिलांना तब्बल 100 वडाच्या झाडांच्या रोपट्यांचे मोफत वितरण केले. याप्रसंगी मंडलाधिकारी निकम, मंडलाधिकारी कुलकर्णी, तलाठी अक्षय लोहार, पोलीस पाटील गणेश डाकवे, शिपाई दत्ता डाकवे व गावातील मान्यवर उपस्थित होते.
त्यांच्या या पर्यावरणपूरक पुढाकाराचे संपूर्ण परिसरातून भरभरून कौतुक होत आहे. वटपौर्णिमेला हिंदू संस्कृतीत विशेष महत्त्व असून या दिवशी महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. मात्र, अलीकडच्या काळात वडाची झाडे कमी होत चालली आहेत. हीच गरज ओळखून केवळ पूजा न करता निसर्गाचे रक्षण व्हावे या उद्देशाने अनिल डाकवे आणि विकास जाधव या तरुणांनी हा अनोखा संकल्प केला. गावातील महिलांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि मिळालेली रोपटी आपल्या अंगणात किंवा शेतात लावून त्यांचे जतन करण्याचा संकल्प केला. केवळ वडाच्या फांदीची पूजा करण्यापेक्षा, जर प्रत्येकाने एक वडाचे झाड लावून ते जगवले तर येणाऱ्या पिढ्यांना शुद्ध हवा आणि ऑक्सिजन मिळेल, हाच विचार करून आम्ही या रोपांचे वाटप केल्याचे तरुणांनी सांगितले.
आजच्या आधुनिक काळात तरुण पिढी सण-उत्सवांकडे वेगळ्या नजरेने पाहत असताना, डाकेवाडीतील या दोन तरुणांनी सामाजिक भान जपले आहे. केवळ सण साजरा न करता त्यांनी गावाला एक प्रकारे ऑक्सिजन बँक भेट दिली आहे, अशा भावना गावातील ज्येष्ठ नागरिकांनी आणि महिलांनी व्यक्त केल्या. या उपक्रमामुळे डाकेवाडी गावाने संपूर्ण परिसरासमोर एक आदर्श निर्माण केला असून, झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश खऱ्या अर्थाने कृतीत आणून दाखवला आहे.

Comments
Post a Comment