अ. भा. बेळगाव मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी प्रा. यशवंत पाटणे
तळमावले/प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव आणि मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. यशवंत पाटणे यांची निवड करण्यात आली आहे. हे संमेलन रविवार, दि. २४ रोजी मराठा मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज संमेलन नगरीत पार पडणार आहे.
प्रा. पाटणे हे महाराष्ट्रातील प्रभावी वक्ते आणि साहित्यिक म्हणून परिचित आहेत. ‘सहावे सुख’, ‘चैतन्याचे चांदणे’ आणि ‘जगाच्या कल्याणा’ यांसारखी त्यांची अनेक पुस्तके वाचकप्रिय ठरली आहेत. शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कारासह विविध सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.
संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात पुण्याचे शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज : आजच्या काळातील गरज’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच तिसऱ्या सत्रात कवी प्रशांत मोरे यांचा ‘काळजातील कविता’ हा विशेष कार्यक्रम रंगणार आहे.
मराठा मंदिर येथे झालेल्या बैठकीत संमेलनाच्या तयारीसंदर्भात विविध निर्णय घेण्यात आले. यावेळी राज्याध्यक्ष रवी पाटील, जिल्हाध्यक्ष अॅड. सुधीर चव्हाण, उपाध्यक्ष डी. बी. पाटील, संजय मोरे, एम. वाय. घाडी, रणजित चौगुले, एल. पी. पाटील, एम. के. पाटील, मोहन अष्टेकर, संजय गौडाडकर, महिला जिल्हाध्यक्ष अरुणा गोजे-पाटील, रोशनी हुंद्रे, मनीषा नाडगौडा, सविता वेसने, गीता घाडी, संजीवनी खंडागळे, नेत्रा मेणसे, स्मिता मेंडके आणि स्मिता किल्लेकर आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment