धनावडेवाडी येथे १९ मेला १७ वा भव्य 'श्री साई भंडारा' उत्सव
ढेबेवाडी/वार्ताहर
तालुक्यातील धनावडेवाडी (निगडे) येथे ओम साई अशोक मित्र मंडळाच्या वतीने १७ व्या वर्षात पदार्पण करत असलेल्या भव्य 'श्री साई भंडारा' उत्सवाचे आयोजन मंगळवार, दिनांक १९ मे २०२६ रोजी करण्यात आले आहे. या सोहळ्यात दिवसभर विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी मेजवानी भाविकांना मिळणार आहे.
या उत्सवाचा प्रारंभ सकाळी ८ वाजता होम-हवन आणि सत्यनारायण महापूजेने होणार असून सकाळी ११ वाजेपर्यंत हे धार्मिक विधी पार पडतील. त्यानंतर दुपारी १२ ते २ या वेळेत परिसरातील महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी २ वाजता श्री साईनाथांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून या मिरवणुकीने संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण होणार आहे.
सायंकाळी ५ ते ७ या वेळेत महाप्रसादाचे (भंडारा) वाटप करण्यात येईल. रात्री ७ वाजता 'ओम साई भजन मंडळ, धनावडेवाडी निगडे' यांच्या सुस्वर भजनाचा कार्यक्रम संपन्न होईल. भजनानंतर रात्री ८ वाजता महिलांसाठी विशेष 'होम मिनिस्टर' स्पर्धा आणि ८:३० वाजता लहान मुलांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाचे खास आकर्षण म्हणजे रात्री ९ वाजता इयत्ता १० वी आणि १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा 'गुणगौरव पुरस्कार' देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
ओम साई अशोक मित्र मंडळाने २०१० पासून सुरू केलेली ही परंपरा यंदा १७ व्या वर्षात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. मु. धनावडेवाडी (निगडे) येथे होणाऱ्या या सर्व कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा व विविध उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक व मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment