कु.सिद्धी काळे या विद्यार्थिनीस स्व.राजाराम डाकवे (तात्या) पारितोषिक जाहीर
तळमावले/वार्ताहर
काळगांव (ता.पाटण) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता 10 वी मध्ये मुलींच्या विभागात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल कु.सिद्धी विकास काळे या विद्यार्थिनीस सन 2026 चे स्व.राजाराम डाकवे (तात्या) पारितोषिक जाहीर केल्याची माहिती शेतीमित्र डॉ.संदीप डाकवे यांनी दिली.
या पारितोषिकाचे स्वरूप रोख रक्कम रु.1,000/-, सन्मानपत्र आणि तात्या पुस्तक असे आहे. चिमुकली सांची डाकवे हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डाकवे परिवारातर्फे दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो. सांचीच्या नावे असलेल्या ठेवपावतीच्या व्याजातून दरवर्षी एका गुणवंत विद्यार्थिनीला हे पारितोषिक दिले जाते. यापूर्वी हे पारितोषिक कु.सानिका पाटील आणि वैष्णवी पाटील या विद्यार्थिनींना मिळाले आहे.
डाकवे परिवाराने शैक्षणिक चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी ज्ञानाची शिदोरी, माणुसकीच्या वहया, एक वही एक पेन, गणवेश वाटप, शाळेला तक्ते वितरण, विनामुल्य बोलक्या भिंती, महापुरुषांच्या प्रतिमांचे वितरण, गुणवंत विद्यार्थ्यांचा घरी जावून सत्कार, स्वाध्यायमाला वितरण, दिव्यांग मुलांना चित्रकला साहित्य वाटप, इ.उपक्रम राबवले आहेत.
यापूर्वी सांचीच्या बारशानिमित्त विविध क्षेत्रातील 13 महिलांचा नारी रत्न पुरस्कार, बोरन्हाण समारंभाला ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ चा संदेश देत महिलांना प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप, कॅलिग्राफीतून अक्षरसंस्कार, पुस्तकांचे झाड, भैरी विहीर मदत, प्रेरणांकित संस्था मदत इ.उपक्रम राबवले आहेत.
चौकट : मुलींच्या स्वप्नांना बळ देत तात्यांच्या स्मृतींना उजाळा..!
हुशार असूनही परिस्थितीमुळे मुलींचे शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी आम्ही या उपक्रमाचे आयोजन केले आहे. ग्रामीण भागातील मुलींनी जिद्दीने शिकत प्रगती करावी आणि त्यांच्या स्वप्नांना बळ मिळावे, हाच उद्देश स्व.राजाराम डाकवे (तात्या) पारितोषिकामागे आहे. मुलींना शिक्षणासाठी प्रेरणा मिळावी, हेच आमचे खरे समाधान आहे.
-शेतीमित्र डॉ.संदीप डाकवे

Comments
Post a Comment