लोटळेवाडी येथे साजरा होणार श्रीस्वामी समर्थ जयंती उत्सव महासोहळा
तळमावले/प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ सेवा सांप्रदाय ट्रस्ट (रजि.) महाराष्ट्र राज्य आयोजित शुक्रवार दि. २० मार्च २०२६ रोजी लोटळेवाडी (काळगांव) येथील श्री स्वामी समर्थ मठात 'श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा' व 'यात्रा महोत्सवाचे' भव्य आयोजन करण्यात आले आहे.
या दिवशी स्वामी भक्तांसाठी पहाटेपासून ते रात्रीपर्यंत विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. व्यासपीठ चालक म्हणून ह.भ.प. निलेश महाराज मस्कर व ह. भ. प विजय महाराज रामिष्टे यांची उपस्थिती असणार आहे.
दिवसभराची कार्यक्रम रूपरेषा:
पहाटे ५ ते ८: अभिषेक, होमहवन, पूजाविधी आणि सारामृत पोथी वाचन.
सकाळी ८ ते ९: श्री ग्रामदैवत वाघिरबा दर्शन पायी दिंडी.
सकाळी ९ ते ११:३०: श्री स्वामी समर्थ पादुका भव्य मिरवणूक (काळगांव ते लोटळेवाडी).
दुपारी १२ वाजता: महाआरती आणि त्यानंतर महाप्रसाद.
दुपारी २ ते ३:३०: ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचा 'चैतन्यमय हरिपाठ'.
दुपारी ४ ते ५:३०: श्री निनाईदेवी भजन मंडळ (काळगांव) आणि जयगुरु भक्त परिवार (मानखुर्द, मुंबई) यांचा हरिभजनाचा कार्यक्रम.
मठामध्ये रात्री ७ वाजेपर्यंत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.सायंकाळी ठिक ६ वाजता: महाआरती व पसायदान नंतर कार्यक्रमाची सांगता होईल.
गृहप्रवेशानिमित्त विशेष कार्यक्रम (१९ मार्च):
उत्सवाच्या आदल्या दिवशी, म्हणजेच गुरुवार दि. १९ मार्च रोजी सायंकाळी ५:०० वाजता, श्री निवृत्ती पांडुरंग मस्कर (मस्करवाडी, काळगांव) यांच्या 'कृपासिंधू' या नूतन वास्तूच्या गृहप्रवेशानिमित्त श्री स्वामी समर्थ नामस्मरण व आरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या सुवर्ण अमृत योगाचा लाभ घेण्यासाठी लोटळेवाडी, काळगांव आणि विभागातील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष मा. श्री सुरेश मस्कर व विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment