कलेचे कौतुक....विद्यार्थ्यांचा घोळका...सेल्फी आणि अॅटोग्राफ

                शुक्रवार दि.2 ऑगस्ट, 2024 हा माझ्या आयुष्यातील एक अभूतपूर्व दिवस.. या दिवशी कासेगाव एज्युकेशन सोसायटीने राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या भव्य चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले होते. विद्यार्थ्यांसोबत गप्पा...संवाद साधत सादर केलेले अक्षरगणेशाचे प्रात्यक्षिक...अक्षरगणेशा  साकारल्यानंतर  विद्यार्थ्यांनी केलेला टाळयांचा प्रचंड कडकडाट...त्यानंतर सेल्फी, अॅटोग्राफ घेण्यासाठी झालेली विद्यार्थ्यांची झालेली गर्दी....काही विद्यार्थ्यांनी नमस्कार करण्यासाठी पायाला केलेला स्पर्श....खूपच भारावून गेलो.

                इस्लामपूर येथील कासेगाव एज्युकेशन सोसायटीचे माजी कलाशिक्षक शशिकांत गुरव सर यांचा प्रेमळ आग्रह आणि त्यांच्यामुळेच मला या सुंदर सोहळयाचे साक्षीदार होता आले. कार्यक्रमाला असलेली कमालीची शिस्त, नियोजनबध्दता आणि वेळेत झालेली सांगता मनाला एक वेगळी ऊर्जा देवून गेली. खरंतर माझ्या वयाइतकी कलेची साधना करणारी कला क्षेत्रातील दिग्गज मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती. संस्थेचे सचिव आर.डी.सावंत, सांगली जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष श्रीकांत माळी, राजारामबापू पाटील चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रदीप पाटील, कलाशिक्षक व्ही.व्ही.ठोंबरे, के.एस.लोहार, एस.एम.गुरव, जयंत करिअर गाईडन्सचे एस.पी.यादव, कासेगांव शिक्षण पतसंस्थेचे अध्यक्ष एस.एस.पाटील उपस्थित होते. या सर्वांची कार्यक्रमाप्रती असणारी आस्था पदोपदी जाणवत होती. 

प्रमुख पाहुणे म्हणून मला सातत्याने वरिष्ठ मंडळी आदर देत होती. यामुळे खरेतर मी जबाबदारीने संकोचून गेलो होतो. कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात जयंत करिअर गाईडन्सचे एस.पी.यादव यांनी   विद्यार्थ्यांच्यात आत्मविश्वास वाढवण्यासाठी जयंत सप्ताह उपक्रम राबवल्याचे सांगितले. याशिवाय संस्थेने स्पर्धा परीक्षा, उद्योजक भेटी, क्षेत्र भेटी यासारखे नावीण्यपूर्ण उपक्रम सुरु असल्याचे सांगितले. यावेळी स्पर्धेतील विजेत्या शाळांच्या मुख्याध्यापक यांना फलक, प्रमाणपत्र देवून त्यांचा गौरव माझ्या व अन्य मान्यवरांच्या हस्ते घेण्यात आला ही सुखावह बाब होती. संस्थेचे आर.डी सावंत आणि अन्य मान्यवर यांनी माझ्या शब्दचित्रांचे आणि सामाजिक उपक्रमांचे भरभरुन कौतुक केेले त्यावेळी अंगावर रोमांच आले. 

                दुपारच्या सत्रात अक्षरगणेशा  सादरीकरणावेळी विद्यार्थ्यांनी टाळयांनी माझा उत्साह वाढवला त्याबरोबर माझ्यावर आणखी जबाबदारीची जाणीव करुन दिली. यानंतर विजेत्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ त्यानंतर सर्व मान्यवरांसामवेत पदयात्री हाॅल च्या बाहेर सर्वांचा ग्रुप फोटो सर्व शिस्तबध्द होतेे.

                सुरुवातीला चहापान त्यानंतर लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन आणि स्वागत झाले. कार्यक्रमात संस्थेचे सचिव आर.डी.सावंत सर यांच्याकडून खांद्यावर प्रेमाची शाल व बुके देण्यात आला. त्यानंतर स्नेहभोजन झाले. कार्यक्रमात शशिकांत गुरव सर, मानसिंग जाधव सर, रोकडे सर यांच्या सह अन्य कलाशिक्षकांचे या कार्यक्रमासाठी असलेले विशेष परिश्रम दिसून आले. विद्यार्थ्यांनी आदराने आपल्या हातावर, वहीवर घेतलेल्या अॅटोग्राफ माझ्या नावाचा केलेला अक्षरगणेशा, नमस्कारासाठी आदरपूर्वक पायाकडे गेलेला विद्यार्थ्यांचा हात ..माझ्यासोबत सेल्फीसाठी केलेला आग्रह, यामुळे खरंतर आज मला एक सेलिब्रिटी असल्याचा फील आला. विशेष म्हणजे अक्षरगणेशा  प्रात्याक्षिकादरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधणाऱ्या  या कार्यक्रमाने मला माझ्या आयुष्यातील पहिली बिदागीही मिळाली हे वेगळेच.

                या सुंदर नियोजनबध्द, शिस्तबध्द कार्यक्रमाचा भाग होण्याचीसंधी दिल्याबद्दल आदरणीय शशिकांत गुरव सर यांचे ऋण शब्दात व्यक्त करता येणार नाहीत. तसेच त्यांना माझ्या नावाची शिफारस करणारा माझा सहकारी आणि सुप्रसिध्द शिल्पकार राजेंद्र कुंभार याचे ही आभार..!

            1 ऑगस्ट, 2011 पासून नियमितपणे कासेगांव एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून इ.1ली ते खुला गट अशी पाच गटात स्पर्धा आयोजित केली जाते. रोख रक्कम स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र विजेत्या मुलांना दिले जाते. अनेक मान्यवर कलाकार या पदयात्रीच्या विचारमंचावर येवून गेले आहेत. या कलाकारांच्या मांदियाळीत यंदा माझ्या अक्षरगणेशा कलेचा योग्य सन्मान झाला याचे समाधान वाटते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी देणे, त्यांच्यात आवडी निर्माण करुन प्रोत्साहन देणे. कासेगांव  एज्युकेशन सोसायटीच्या अनोख्या उपक्रमास माझ्या शुभेेच्छा...!

  -डाॅ.संदीप डाकवे

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न