चंद्रकांत चाळके यांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती
तळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील चाळकेवाडी (कुंभारगांव) चे सुपुत्र चंद्रकांत चाळके यांची नवी मुंबई शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती झाली आहे. काही दिवसांपूर्वी चंद्रकांत चाळके यांची पाटण तालुका संपर्क प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्ष वाढीसाठी विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच गावातील लोकांचा शिवसेना पक्षात प्रवेश करत असून विकास निधी आणण्यामध्ये ते यशस्वी ठरले आहेत. पक्षाची कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यापर्यंत ते नेहमीच प्रयत्नशील आहेत. त्यांच्या निवडीमुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री ना.शंभूराज देसाई, शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांसह विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. या निवडीबद्दल चाळकेवाडी ग्रामस्थांनी मायभूमीत त्यांचे जल्लोषी स्वागत केले आहे. याप्रसंगी सरपंच अशोक चाळके, शाखाप्रमुख मारुती निवडूंगे, राजेंद्र चाळके, धनाजी चाळके व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
चंद्रकांत चाळके यांच्या वाटचालीचा आढावा घेणारा लेख...
आपल्या आगळ्यावेगळ्या कर्तृत्वाने समाजमनावर आपली कर्तृत्व मुद्रा चंद्रकांत चाळके या युवा नेतृत्वाने उमटवली आहे. केवळ स्वतः पुढे न जाता बरोबरीच्या युवकांना एक वेगळी दिशा देवून सोबत घेवून जाण्याचे काम ते करत आहेत हे अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आह. ‘‘एकमेकां सहाय्य करु, अवघे धरु सुपंथ’’ हे ब्रीद वाक्य त्यांनी खऱ्या अर्थाने सार्थ केले आहे. सहकार क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या सान्निध्यात राहून ‘‘साईराज’’ को.ऑप.क्रेडीट सोसायटीचा त्यांनी शुभारंभ केला. यामध्ये आपल्या कार्यशैलीचे वेगळेपण चंद्रकांत चाळके यांनी जपले आहे. आजच्या तरुणाईसमोर आपला आदर्श निर्माण केला आहे. साईराज सोसायटीच्या माध्यमातून अनेक कुटूंबे उभी करण्याचे काम त्यांनी केले आहे. गरजूंना केवळ अर्थपुरवठा न करता त्यांना समाजात ताठ मानेेने कसे उभे करता येईल याचा ते नेहमी विचार करतात.
आर्थिक चळवळीला समाजसेवेची जोड देण्यासाठी जनकल्याण सेवाभावी या ट्रस्टची स्थापना केली आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून गरजूंना मदत देण्याचे काम ते करत आहेत. गरजूंच्या मदतीसाठी वेळोवेळी सांस्कृतिक मदतनिधी कार्यक्रमांचे त्यांनी आयोजन केले आहे. गावातील शाळेतील मुलांना मोफत वह्या वाटप व इतर शैक्षणिक साहित्य देवून त्यांनी मुलांना शिक्षणासाठी प्रेरीत केले आहे. आरोग्य शिबीराचे देखील यशस्वी आयोजन केले आहे.
युवा खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मोठ्याा रकमेची प्रोत्साहनपर बक्षीसे असणारी भव्य क्रिकेट स्पर्धा स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करत आहेत. सहकार, शिक्षण, क्रीडा, आरोग्य इ.क्षेत्रात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. ‘‘घार उडते आकाशी, परंतू तिचे लक्ष पिलापाशी'’ या उक्तीप्रमाणे त्यांचे कार्यक्षेत्र मुंबई असले तरी त्यांना आपल्या मातीची ओढ गप्प बसू देत नाही. गावीदेखील ते चांगल्या प्रकारे काम करत आहेत. गावातील सर्व लोकांना एकत्र घेवून विकासासाठी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे नेतृत्व स्वीकारत प्रत्येक निवडणूकीत ना.शंभूराज देसाई यांना समर्थ साथ दिली आहे. शिवाय नामदारसाहेबांच्या मनामध्ये आपली वेगळी जागा त्यांनी निर्माण केली आहे. गावातील लोकांना एकत्र घेवून कुटूंब प्रमुखाची भूमिका त्यांनी वठवलेली दिसून येते. गावचे प्रथम नागरिक सरपंच संजय चाळके यांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटूंबियाला आपल्या सहकारी यांच्या मदतीने मदतीचा हात दिला. यातून त्यांचा नेतृत्व गुण दिसून येतो. पाटण तालुक्यातील चाळकेवाडी गावामध्ये विविध कार्यक्रम, यात्रा, गणेशोत्सव यामध्ये त्यांचा नेहमी पुढाकार असतो. लोकांना एकत्र घेवून जाण्याची त्यांची भूमिका त्यांनी प्रामुख्याने जपली आहे. उच्चशिक्षित असलेले चंद्रकांत चाळके हे संयमी परंतू तितकेच आक्रमक स्वभावाचे, मदतीला सदैव तयार असणारे व्यक्तिमत्त्व आहे.
विभागातील तरुणांच्या गळ्याातील ताईत असणारे चंद्रकांत चाळके सर्वांसाठी ‘आयडाॅल’ आहेत. त्यांच्या या विविधांगी गुणांमुळेच तरुणांईमध्ये त्यांच्याबद्दल एक ‘क्रेझ’ निर्माण झाली आहे.
तरुणाई मधील सकारात्मक उपक्रमासाठी आणि धडपडणाऱ्या उत्साही तरुणांसाठी ते नेहमी पुढे असतात. कर्तव्यनिष्ठा आणि विवेकबुध्दीच्या जोरावर सहकारासह विविध क्षेत्रातील त्यांचा वावर अफलातून आहे.
शब्दांकन : डाॅ.संदीप डाकवे
अध्यक्ष, वांगव्हॅली पत्रकार संघ
संस्थापक/अध्यक्ष, स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट, डाकेवाडी (काळगांव)
ता.पाटण, जि.सातारा. 415112

Comments
Post a Comment