चिमुकल्या सांचीचा बोरन्हाण सोहळा अक्षरसंस्कारातून संपन्न
तळमावले/वार्ताहर
शिशुसंस्कार संक्रातीला लहान मुलांना बोरन्हाण घालण्याची पारंपारिक पध्दत आहे. बदलत्या ऋतुची बाधा मुलांना होवू नये व या काळात असलेली फळे मुलांनी खावीत हा हेतू यामागे असतो. पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील कु.सांची रेश्मा संदीप डाकवे या चिमुकलीचा दुसरा बोरन्हाण समारंभ अक्षरसंस्कारातून संपन्न झाला. या समारंभासाठी अभंगाच्या ओळींची कॅलिग्राफी असणारे पतंग व पोस्टर्स डेकोरेशनासाठी वापरले होते. ही कॅलिग्राफी सांचीचे वडील विश्वविक्रमवीर चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी केली होती. यापूर्वी सांचीच्या प्रथम बोरन्हाणादिवशी महिलांना प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप, जि.प.केंद्रशाळा काळगांव ला महापुरुषांच्या प्रतिमांचे वितरण केले होते.
महिलांनी प्रथमतः सांचीला औक्षण केले. त्यानंतर बोरे, कुरमुरे, भुईमुगाच्या शेंगा, तिळगुळ, यासह लहान मुलांना आवडणारे चाॅकलेट, बिस्कीट, जेम्स गोळया अशा पदार्थांनी सांचीला बोरन्हाण घातले. त्यानंतर डाकवे परिवाराने मुलांना खाऊ वाटप केले. हा क्षण स्पंदन डाकवे, ओवी पोळ, सौरभ नलवडे, प्रेरणा माने, अभिजीत जाधव या मुलांनी खूप एन्जाॅय केला. दरम्यान, मुलांना पेन्सिलचे वाटप केले. यावेळी रेश्मा डाकवे, पुनम जाधव, भारती पोळ, संगिता कदम, सौ.माने, साक्षी व अन्य महिला उपस्थित होत्या.
यापूर्वी सांचीच्या नामकरणावेळी डाकवे परिवाराने सामाजिक संदेश असलेल्या पत्रिकांचे वाटप आणि कर्तृत्ववान महिलांचा पुरस्काराने सन्मान इ. विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. तसेच सांचीच्या प्रथम वाढदिवसाला तिचे आजोबा स्व.राजाराम डाकवे (तात्या) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ इ.10 वीतील प्रथम आलेल्या मुलींसाठी रोख पारितोषिक असे विधायक उपक्रम राबवले आहेत. घरगुती कार्यक्रम करताना विधायक उपक्रम राबवण्याची परंपरा डाकवे परिवाराने या निमित्ताने कायम जपल्याचे दिसून आले.



Comments
Post a Comment