डाॅ.संदीप डाकवे यांना महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार जाहीर
तळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांना महाराष्ट्र राज्य शासनाचा कृषी विभागाचा पत्रकारितेतील सर्वोच्च वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार जाहीर झाला आहे. रुपये 1 लाख 20 हजार, मानपत्र, मानचिन्ह व रु.15 हजार प्रवास भत्ता असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे शेतकरी, पत्रकार शेतीमित्र, संशोधक यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मस्त्यव्यवसाय यांच्यावतीने कृषी क्षेत्रातील लिखाणाबद्दल सन 2022 चा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार डाॅ.डाकवे यांना जाहीर केला आहे.
डाॅ.संदीप डाकवे यांनी कृषाीविषयक बातम्या, शेतकरी यशोगाथा, कृषी योजना प्रसारासाठी स्वतःची प्रकाशने, आणि सोशल मिडीयाचा प्रभावी वापर, स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून राबवलेले उपक्रम, यासोबतच विविध समाज माध्यमांचा वापर प्रभावीपणे करत लिखाण केले होते. यासाठी त्यांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, प्रकल्प संचालक आत्मा सातारा विकास बंडगर, कृषि उपसंचालक जि.अ.कृ.अ. कार्यालय सातारा संतोषकुमार बरकडे, कृषि विकास अधिकारी जि.प.सातारा विजय माईनकर, कराडचे उपविभागीय कृषी अधिकारी रियाज मुल्ला, पाटण तालुका कृषी अधिकारी कुंडलिक माळवे, तंत्र अधिकारी (विस्तार) जि.अ.कृ.अ. कार्यालय सातारा समीर पवार, कृषि सहायक प्रमोद गाढवे, कृषी सहायक गणेश सावंत यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
यापूर्वी डाॅ.डाकवे यांना पत्रकारितेसाठी महाराष्ट्र शासनाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, राजमाता जिजाऊ स्वावलंबन सवोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, जि.प. कृषी विभाग सातारा यांचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, ग्रामीण विकास यंत्रणेचा राजमाता जिजाऊ स्वावलंबन असे विविध पुरस्कार मिळाले आहेत.
डाॅ.संदीप डाकवे यांना वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पालकमंत्री ना.शंभूराज देसाई, खा.राहूल शेवाळे, मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे, जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय देसाई, पाटण तालुका बाजार समितीचे उपसभापती विलास गोडांबे, पं.स.सदस्य पंजाबराव देसाई, वांगव्हॅली पत्रकार संघ, स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट चे पदाधिकारी यांच्यासह अन्य मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. लवकरच या पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री, राज्यपाल, कृषीमंत्री आणि अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक होणार आहे.
चौकट : शेतीमित्र पुरस्कार वडिलांना समर्पित : डाॅ.संदीप डाकवे
माझे वडील स्व.राजाराम डाकवे (तात्या) यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासार्यंत शेती आणि मातीशी अखंड नाते जपले होते. या पुरस्कारामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे मला जाहीर झालेला वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार मी त्यांना समर्पित करत असल्याची भावनिक प्रतिक्रिया डाॅ.संदीप डाकवे यांनी याप्रसंगी व्यक्त केली आहे.


Comments
Post a Comment