मानधनातून दिला त्यांच्या जगण्याला हातभार चौगुलेवाडी ग्रामपंचायतीचा आदर्शवत उपक्रम


तळमावले / वार्ताहर 

पाटण तालुक्यातील काळगाव विभागातील चौगुलेवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सचिन आचरे आणि उपसरपंच जालिंदर कोळगे यांनी आपले मानधन ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील वाड्यावस्त्यांत वास्तव्यास असलेल्या विधवा, निराधार महिलांना देऊन त्यांच्या जगण्याला हातभार देण्याचा निर्णय घेतला आहे. या वेगळ्या संकल्पनेद्वारे संबंधित प्रत्येक महिलेला ११ हजार रुपयांची मदत मिळणार आहे.

चौगुलेवाडी ग्रामपंचायतीच्या कक्षेत मुटलवाडी, कोळगेवाडी, आचरेवाडी, सावंतवाडी, मातंगवस्ती आदी वाड्यावस्त्यांचा समावेश होतो. डिसेंबर २०२२ मध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. सरपंचपदी सचिन आचरे, तर उपसरपंचपदी जालिंदर कोळगे यांची निवड करण्यात आली. आपणास मिळणारे मानधन ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील विधवा निराधार महिलांना देऊन त्यांच्या जगण्याला त्यातून हातभार देण्याचा निर्णय सरपंच व उपसरपंचांनी अलीकडेच घेऊन त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. 'माझं गाव, माझी पंढरी' या नावाने ही आगळीवेगळी संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यासाठी एकत्रित चिट्ट्या टाकून त्यातून काढलेल्या क्रमानुसार संबंधित महिलांची यादी तयार केली असून, दर दोन महिन्यांनी त्यातील एका महिलेला ११ हजार रुपये देण्यात
येत आहेत. पाच वर्षे नियमितपणे हा उपक्रम सुरू राहणार असल्याचे सरपंच श्री.सचिनभाऊ आचरे यांनी सांगितले. गावात नुकत्याच झालेल्या मदत वाटप कार्यक्रमास ग्रामपंचायत पदाधिकारी, महिला पुरुष ग्रामस्थ उपस्थित होते.त्यांच्या ह्या सगळ्या वेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.चौगुलेवाडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू केलेला हा उपक्रम राज्यातील सर्व ग्रामपंचायतीना एक आदर्शवत आहे हे मात्र नक्की .

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न