लव यू मित्रांनो.....



 लव यू मित्रांनो.....

काल दुपारी 3 वाजून 42 मिनिटांनी मोबाईलची रिंग वाचली. स्क्रीनवर नाव आले प्रकाश डिगे. कामामुळे कंटाळलो असल्याने पहिला काॅल मी उचलला नाही. परंतू परत त्याचा काॅल आला. आता मात्र मी तो काॅल टाळू शकलो नाही. तो उचलला. प्रकाश डिगे माझा एटीडीचा वर्गमित्र. अष्टपैलू असलेला...चित्रकला, गायन, वादन, डान्स यामध्ये माहीर असलेला. बरेच दिवसानंतर त्याचा हा काॅल आलेला. बराच वेळ मग आमच्यात गप्पा झाल्या. गावाच्या राजकारणावर जरा जास्तच झाल्या. त्यानंतर त्याने महेश सुतार याला काॅन्फरन्सला घेतले. महेश सुतार हा पेठवडगावचा तो देखील आमच्या बरोबर एटीडी ला होता. मिश्किल स्वभावाचा. बोलताना कोपरखळी मारणारा....त्यानंतर त्याने विजय साबळे याला अॅड केले. विजय हा साबळेवाडीचा...सध्या या गावाचे नाव ‘सागाव’ असे झाले आहे. अतिशय दिलदार आणि मित्रांसाठी कायम पुढे असलेला....त्यानंतर त्याने राजू कुंभार याला अॅड केले. मराठवाडी धरणामुळे पुनर्वसित झालेल्या उमरकांचन गावचा तो....स्वतःची विचारशैली असलेला. प्रत्येकाला समजावून घेणारा, तो शिल्पकलेत एकदम पारंगत....त्यानंतर प्रकाशने मयुर महामुनी याला अॅड केले. कॅलिग्राफीची आवड असलेला...आणि ‘मोगरा’ फाॅन्ट वर प्रचंड प्रेम करत असलेला...आणि मी मात्र बातम्यांत गुंतलेला...काहीसा स्वार्थीच असलेला..... 

काॅन्फरन्स काॅलवर सर्वजण एकमेकांची खेचाखेची करत होते. खूप मस्त वाटलं. मला कामाने आलेला थकवा निघून गेला. मित्र आॅक्सिजनचे काम करतात असे कुठेतरी वाचलं होतं ते प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले. 

महेश सुतार सोडला तर आम्ही राजू कुंभार, प्रकाश डिगे, विजय साबळे, अजय पाटील, अनिल देसाई, योगेश जाधव, मयुर महामुनी, सुनील देसाई सर सर्व पाटणवाले आणि अनिल देसाई सर्वजण एकत्र रहायला होतो. त्यामुळे प्रत्येकाच्या घरची परिस्थिती, स्वभाव, सवयी सर्व एकमेकाला माहिती होते. काॅलेजला असतानाचे मित्र आणि आताचे मित्र यांच्या स्वभावात काही अंशी फरक झालेला दिसला परंतू कौटूंबिक जबाबदारी जाणीव असलेली दिसून आली. खरंतर आम्हा सर्वांना ‘कलाशिक्षक’ व्हायचे होते. त्यासाठीच सर्वजण एटीडीला प्रवेश घेतला होता. मात्र राजू कुंभार सोडला तर आमच्या बॅचमधील कोणीच शिक्षक झाला नाही. पण प्रत्येकजण कलेच्या संबंधित क्षेत्रात आपले करियर घडवत आहेत. कला ही जगायला शिकवते हे आम्हाला कळले.

एटीडी मुळे आम्हाला प्रत्येकातील कलेला वेगळी दिशा मिळाली. आमचे प्राचार्य विजय धुमाळ सर, प्रा.सागरनाथ गायकवाड सर, प्रा.समीर शेख सर, प्रा.जयंत कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कलेचे शिक्षण घेतले. आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो त्या ठिकाणी दुडे कुटूंबियांनी देखील आम्हाला चांगले सहकार्य केले हे आम्ही विसरु शकत नाहीत. ज्ञात अज्ञात अनेकांना यानिमित्ताने धन्यवाद द्यावे वाटतात.

एटीडीच्या वार्षिक स्नेहसंमेलनात मी प्रकाश डिगे व आमचे सर्व मित्र यांनी केलेले विनोदी मुकनाटय, आधुनिक रामायण, प्रकाशचा डान्स आठवला. ‘काला कौआ काट खायेगा’ या गाण्यावर मी, राजेश, विजय, अनिल यांनी केलेला भन्नाट विनोदी बुटका डान्स मुळे शाहू कलामंदीर अक्षरशः नाचायलाच लावले होते. प्रकाशच्या फोनमुळे पुन्हा एकदा ते आठवले.

फोनवर आम्ही सर्वांनी विविध आठवणी जाग्या केल्या. त्यामुळे आम्हाला काॅलेज, काॅलेजचा परिसर, रुम इ. आठवले. खरंतर पुन्हा एकदा काॅलेजला जावेसे वाटू लागले.  

मित्रांनो, आपण सर्वजण लवकर नक्की भेटू...एकत्र भेटण्यासाठी मी प्लॅन करेनच...संपर्कात राहू...काळ कठीण आहे...कोरोनाचे हेही दिवस जातील...घरी रहा..सुरक्षित रहा...कुटूंबांची काळजी घ्या...

खरंच, प्रकाश आणि सर्व मित्रांबरोबर बोलल्यामुळे पुन्हा एकदा ताजातवाना झालो...त्यामुळेच 

‘लव यू मित्रांनो....’


- डाॅ.संदीप डाकवे

   97640 61633


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न