डोंगराच्या कुशीत वसलेल्या श्री काळंबादेवी भंडारा उत्सवात हजारो भाविकांची मांदियाळी
कुंभारगांव/राजेंद्र पुजारी यांचेकडून
पाटण तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेल्या श्री काळंबा देवीच्या वार्षिक भंडारा उत्सव आणि अखंड हरिनाम वीणा सप्ताहाची हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात सांगता झाली. काल्याचे कीर्तन, महिलांचे गोल रिंगण आणि महाप्रसादासाठी परिसरातील गावांतून भाविकांनी डोंगरावर मोठी गर्दी केली होती.
तळमावलेपासून अंदाजे पाच ते सहा किलोमीटर अंतरावर डोंगरावर हे जागृत देवस्थान आहे. तळमावले, गुढे आणि शिद्रुकवाडी येथून वेडीवाकडी वळणे घेत तीव्र चढणीच्या घाटमार्गाने भाविक मंदिराजवळ पोहोचतात. १०-१५ वर्षांपूर्वी या ठिकाणी जाण्यासाठी केवळ पाऊलवाट होती, मात्र आता प्रवासाची सोय झाल्याने यंदा भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली.
यंदाच्या काळंबादेवी भंडारा उत्सवानिमित्त २९ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत 'अखंड हरिनाम वीणा सप्ताहाचे' आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात राज्यभरातील अनेक नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तन सेवा पार पडल्या. ५ सप्टेंबर रोजी ह.भ.प. सचिन महाराज कुंभारगावकर यांच्या सुश्राव्य काल्याच्या कीर्तनाने या भक्तीमय सप्ताहाची सांगता झाली.
महिलांच्या गोल रिंगणाने वेधले लक्ष या सोहळ्यादरम्यान हजारो भाविकांनी देवीचे तसेच पालखीतील देव-देवतांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी उपस्थित महिलांनी पारंपारिक गोल रिंगण करत देवीचा जयघोष केला, ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला होता. यानंतर मानकऱ्यांच्या हस्ते दहीहंडी फोडून उत्सवाची अधिकृत सांगता करण्यात आली.
उत्सवाच्या शेवटच्या दिवशी हजारो भाविक आणि भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यात्रेनिमित्त मंदिर परिसरात मेवा-मिठाई आणि लहान मुलांसाठी खेळण्यांच्या दुकानांची मोठी रेलचेल होती. अतिशय शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात हा वार्षिक सोहळा संपन्न झाला.
Comments
Post a Comment