अक्षरप्रेमींचा गौरव..! राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार जाहीर
तळमावले/(वार्ताहर)
नेहमीच समाजाभिमुख उपक्रम राबवत असलेल्या पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने वाचनसंस्कृतीचा जागर आणि साहित्याची सेवा करण्यासाठी राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार 2026 ची घोषणा करण्यात आली आहे. साहित्याच्या प्रांगणात आपला स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी यंदा संपूर्ण महाराष्ट्रातून 15 लेखक आणि त्यांच्या दर्जेदार साहित्यकृतींची निवड करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष डॉ.संदीप डाकवे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
या स्पर्धेचे खास वैशिष्ट्य म्हणजे, आलेल्या पुस्तकांपैकी एक पुस्तक पुस्तकाचं झाड या उपक्रमासाठी वापरले जाते, दुसरे पुस्तक वाचनालयाला दिले जाते, तर तिसरे पुस्तक स्पर्धेच्या संग्रही ठेवण्यात येते. या अनोख्या उपक्रमातूनच स्व. राजाराम डाकवे (तात्या) वाचनालय आकारास येत आहे.
या साहित्य पुरस्काराचे हे चौथे वर्ष असून, या उपक्रमाला राज्यभरातून उदंड प्रतिसाद लाभला. यावर्षी स्पर्धेसाठी विविध विषयांवरील सुमारे 75 हून अधिक पुस्तके दाखल झाली होती. त्यातून परीक्षण करून अंतिम 15 मानकरी निवडण्यात आले आहेत. आतापर्यंत या मंचावरून राज्यातील सुमारे 75 साहित्यिकांना गौरविण्यात आले असून, सन्मानपत्र, मानाचा गमजा आणि ग्रंथ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावर्षी पुरस्कारावर मोहोर उमटवणाऱ्या साहित्यिकांमध्ये अनेक दिग्गजांसह नवोदितांचाही समावेश आहे. सन्मानित होणाऱ्या साहित्यकृतींमध्ये प्रदीप बडदे यांच्या माणुसकीची अंत्ययात्रा, डॉ.शिवाजी शिंदे यांच्या भावगंधित व्यक्तिमत्त्वे (लेखसंग्रह), अमृता खंडेराव यांचे बालसाहित्य उलटं टांगलेलं भूत आणि म्हातारी, सदाशिव बर्गे यांचे शंभरची चिल्लर, सौ.कांता वि. भोसले यांचे रानफुल आणि तुकाराम कांबळे यांच्या बिंब-प्रतिबिंब या पुस्तकांचा प्रामुख्याने समावेश आहे. यासोबतच रामभाऊ डुबल (रामभाऊंच्या चारोळ्या), प्रकाश संकपाळ (कुडपाण), वीणा रारावीकर (यू हॅपिअर-अनुवाद), सत्यवान मंडलिक (इथे जन्मली माणुसकी), सौ.सुमन चंद्रशेखर (आठवणींचा दरवळ), डॉ.शुभांगी कुंभार (विचारदीप निबंधमाला), प्रा.पौर्णिमा केरकर (गोमंतकीय लोकसाहित्य-एक दृष्टीक्षेप), चुडाराम बल्हारपुरे यांचे तीन अंकी लोकनाट्या जत्रा घडली नागोबाची आणि डॉ.स्वाती पाटील यांच्या निळी सावळी नव्हाळी या दर्जेदार पुस्तकांनाही यावर्षी सन्मानित केले जाणार आहे.
स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट केवळ पुरस्कार देऊन थांबत नाही, तर ग्रामीण व शहरी भागात वाचन चळवळ रुजवण्यासाठी ते सतत नवनवीन आणि कल्पक प्रयोग करत असतात. दिवाळी अंक स्पर्धा, निबंध स्पर्धा, भित्ती चित्र काव्य स्पर्धा आणि कॅलिग्राफीतून अक्षरसंस्कार यांसारख्या कलात्मक उपक्रमांसह पुस्तकांचं झाड, पुस्तकांची आरास आणि पुस्तकांची गुढी असे अनोखे उपक्रम ट्रस्टने यशस्वीपणे राबवले आहेत. कोणत्याही कार्यक्रमात पुष्पगुच्छांऐवजी पुस्तकांनी मान्यवरांचे स्वागत करण्याची त्यांची प्रथा विशेष कौतुकास्पद ठरली आहे. याशिवाय स्व.राजाराम डाकवे (तात्या) सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाच्या माध्यमातून महिलांना प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप करणे, शासनाच्या वाचन चळवळ उपक्रमात सक्रिय सहभाग घेणे आणि सा.स्पंदन एक्सप्रेस मासिकाच्या माध्यमातून नवोदित लेखकांना लिखाणासाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचे मोलाचे कार्य ट्रस्ट करत आहे.
यावेळी ट्रस्टचे मार्गदर्शक प्रा.ए.बी.कणसे, उपाध्यक्ष आप्पासो निवडुंगे, सचिव रेश्मा डाकवे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. निवड झालेल्या सर्व साहित्यिकांना आणि कवींना लवकरच एका भव्य आणि दिमाखदार सोहळयात गौरविण्यात येणार आहे.

Comments
Post a Comment