सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेमाचा विद्यार्थ्यांना दिला संदेश - प्राचार्य प्रो डॉ सतिश घाटगे
तळमावले (प्रतिनिधी) :
येथील काकासाहेब चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विशेष शिबिराचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, सामाजिक बांधिलकी, राष्ट्रप्रेम, नेतृत्वगुण आणि व्यक्तिमत्त्व विकासाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक आणि मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराडचे प्राचार्य (प्रो.) डॉ. सतीश घाटगे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रा. (डॉ.) उषादेवी साळुंखे या होत्या, तर जनसहकार समुदायाचे सर्वेसर्वा मारुतीराव मोळावडे, पोलीस पाटील व पत्रकार विजय सुतार आणि पत्रकार अमोल चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. सतीश घाटगे यांनी राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, सामाजिक उत्तरदायित्व आणि राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करणारी प्रभावी चळवळ असल्याचे सांगितले. महात्मा गांधी यांच्या विचारातून प्रेरित झालेली ही योजना युवकांच्या सहभागातून समाजपरिवर्तन आणि राष्ट्रविकासाचे महत्त्वपूर्ण कार्य करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, आळंदी ते पंढरपूर वारीदरम्यान राबविण्यात येणारे स्वच्छता अभियान असो किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळातील मदतकार्य, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक निस्वार्थ भावनेने समाजसेवा करत असतात. इतरांसाठी जगण्याची प्रेरणा, सामाजिक जाणीव आणि सकारात्मक दृष्टिकोन विद्यार्थ्यांना NSS च्या माध्यमातून मिळतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रमुख पाहुणे मारुतीराव मोळावडे यांनी ग्रामीण भागातील सामाजिक कार्याचा अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडताना राष्ट्रीय सेवा योजना ही जबाबदार, सुसंस्कारित आणि समाजाभिमुख नागरिक घडविण्याची प्रभावी शाळा असल्याचे सांगितले. समाजाशी नाते जोडणारी आणि नेतृत्वगुण विकसित करणारी ही योजना प्रत्येक विद्यार्थ्याने आत्मसात करावी, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय मनोगतात प्रभारी प्राचार्या प्रा. (डॉ.) उषादेवी साळुंखे यांनी राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. संकटकाळात स्वयंसेवकांनी केलेली सेवा समाजासाठी प्रेरणादायी असून, माणुसकीची जाणीव आणि सामाजिक संवेदनशीलता विकसित करण्यासाठी NSS हे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम अधिकारी डॉ. महेश चव्हाण, डॉ. व्ही. एम. वागतकर तसेच प्रा. सचिन पुजारी यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी प्रा. सचिन पुजारी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. दीपाली पाटील यांनी केले, तर आभार ज्योती (मनीषा) पाटील यांनी मानले. कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment