श्री क्षेत्र सलतेवाडी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे ३९ व्या वर्षात पदार्पण
तळमावले/वार्ताहर
श्री समर्थ सद्गुरू योगीराज हरिहर महाराज यांच्या प्रेरणेने आणि श्री समर्थ सद्गुरू ज्ञानेश्वर माऊली (सपकळवाडी) यांच्या दिंडी चालक व मार्गदर्शकत्वाखाली आयोजित करण्यात आलेला 'माऊली पायी दिंडी सोहळा' मंगळवार, दिनांक ०७ जुलै २०२६ रोजी दुपारी ३ वाजता श्री क्षेत्र सलतेवाडी (वाझोली, ता. पाटण, जि. सातारा) येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. यंदा या दिंडी सोहळ्याचे ३९ वे वर्ष असून वांगव्हॅली पंचक्रोशीतील व इतर सर्व भागांतील भाविकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.
या सोहळ्यात ह.भ.प. श्री. रामचंद्र महाराज शिबे (शिबेवाडी) हे विणेकरी म्हणून, तर ह.भ.प. पांडुरंग महाराज सलते आणि ह.भ.प. वसंत निगडकर हे चोपदार म्हणून आपली सेवा बजावणार आहेत. एकूण १८ दिवसांच्या या प्रवासात रोज मालिका भजन, दुपारी प्रवचन, संध्याकाळी हरिपाठ आणि रात्री कीर्तन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. हा पायी दिंडी सोहळा मंगळवार, ७ जुलै रोजी सुरू होऊन गुरुवार, २३ जुलै २०२६ रोजी पंढरपूर येथे पोहोचेल.
प्रवासादरम्यान विविध गावांतील भाविक व देणगीदारांमार्फत वारकऱ्यांसाठी चहापान, अल्पोपहार, दुपारची न्याहारी आणि मुक्काम व भोजनाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. या दिंडी सोहळ्यामध्ये सलतेवाडी, मत्रेवाडी, वाझोली, धामणी, मस्करवाडी नं. २, येळेवाडी, काळगाव, आचरेवाडी, तळमावले, दळवीवाडी, शिद्रुकवाडी, मान्यांचीवाडी, कुसूर, कोळेवाडी, करवडी, जाधववाडी, पवारवाडी, देवेवाडी, शिबेवाडी, तुपेवाडी, गलमेवाडी या भागांतील भजनी मंडळे सहभागी होऊन आपली सेवा रुजू करणार आहेत. दिंडीकरिता 'MH-50-5374' (श्री. रघुनाथ सखाराम चव्हाण, धामणी) या गाडीची व्यवस्था करण्यात आली असून, सर्व वारकऱ्यांनी आपल्यासोबत ताट, वाटी, तांब्या आणि स्वतःला लागणारे आवश्यक साहित्य सोबत आणायचे आहे. तरी प्रस्थान दिवशी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने हजर राहून या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन 'श्री. भक्तीज्ञान संत सेवा मंडल, सलतेवाडी' यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment