श्री क्षेत्र गलमेवाडी ते पंढरपूर आषाढी पायी वारी दिंडी सोहळ्याचे ८ जुलै रोजी भव्य प्रस्थान

तळमावले/अनिल देसाई यांचेकडून

श्री समर्थ सद्गुरू हरिहर महाराज, वै.ह.भ.प. गुरुवर्य बाळब्रह्मचारी विवेकसिंधु रमेश काटेकर महाराज, शाम महाराज, आळंदीकर व साधु बुवा-कवर बुवा यांच्या कृपाशीर्वादाने आयोजित करण्यात आलेल्या 'श्री क्षेत्र गलमेवाडी ते पंढरपूर आषाढी पायी वारी दिंडी सोहळ्याचे' यंदा ९ वे भव्य वर्ष आहे. या सोहळ्याचे प्रस्थान बुधवार, दिनांक ८ जुलै २०२६ रोजी दुपारी ४ वाजता वै. रमेश महाराज काटेकर समाधी मंदिर, गलमेवाडी येथून होणार असून, पहिला मुक्काम श्री नाईकबा मंदिर, गलमेवाडी येथे असेल. हा पायी वारी सोहळा ८ जुलै २०२६ ते २६ जुलै २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे.

हा भव्य दिंडी सोहळा गलमेवाडी, शेंडेवाडी, चाळकवाडी, मोरेवाडी, मान्याचीवाडी, कुंभारगाव, शिवेवाडी, माटेकरवाडी, वायचळवाडी, वरेकरवाडी, कळेत्रेवाडी, बोरांगवाडी, तळमावले-तांडाईचीवाडी, धुमाळवाडी, साईकडे, मानेगाव, करपेवाडी व पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत पुढे मार्गस्थ होणार आहे. वारी दरम्यान मान्याचीवाडी, विंग, रेणुका मेस, ओझर्डेवाडी, कण्हेर, वाखरी आणि पंढरपूर अशा विविध गावांमध्ये आणि मुक्कामाच्या ठिकाणी दुपारची विश्रांती, रात्रीचे मुक्काम आणि महाप्रसादासाठी (संतपंगत) अन्नदानाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

वारीमध्ये वारकऱ्यांच्या सोयीसाठी आणि सोहळा सुकर करण्यासाठी विविध सेवांची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. यात ह.भ.प. लहुदास महाराज शेळकेवाडी, बाबुराव भोसले व इतर नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा आणि विविध भजनी मंडळांची भजन साथ लाभणार आहे. सोबतच, अश्विनी शेती फार्म (तळमावले) यांच्यातर्फे ट्रॅक्टर सेवा आणि गुरुदेव शेती फार्म (मोरेवाडी) यांच्या वतीने पाणी टँकरची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी डॉ. अरविंद नांगरे व प्रांजली सेवा श्री. बबन तांडेल यांच्या वतीने मोफत वैद्यकीय सेवा पुरवली जाणार आहे, तर ओंकार साऊंड सर्व्हिस, गलमेवाडी यांच्या वतीने ध्वनिक्षेपक व जनरेटर व्यवस्था केली जाणार आहे.

या संपूर्ण भव्य सोहळ्याचे नियोजन रमेश काटेकर महाराज प्रतिष्ठान, ग्रामस्थ मंडळ, सर्व गणेश मंडळ, दुर्गामाता मंडळ व मुंबई ग्रामस्थ, गलमेवाडी यांच्या वतीने अत्यंत नेटकेपणाने करण्यात आले आहे. या पवित्र आषाढी पायी वारी दिंडी सोहळ्यामध्ये पंचक्रोशीतील जास्तीत जास्त भाविक भक्तांनी आणि वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन विठ्ठल नामाचा आणि दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

अक्षरप्रेमींचा गौरव..! राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार जाहीर

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न