भरेवाडीत घरातून बिबटयाने कुत्र्याला नेले


तळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील काळगांव येथील भरेवाडी भटकी नवीन वसाहत येथून काल (दि.16 रोजी) पहाटे 2.45 च्या सुमारास बिबटयाने घरातील कुत्रे नेल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अनिल मारुती लोटळे हे भटकी नवीन वसाहत येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या घराच्या कपांऊंड मध्ये बिबटयाने घुसून कुत्र्याला नेले आहे. सकाळी घरामध्ये काम करत असताना कुत्रा नसल्याचे लोटळे कुटूंबियाला दिसून आले. त्यावेळी त्यांनी इतरत्र शोधाशोध केली परंतू कुत्रा कुठेच आढळला नाही. त्यानंतर अनिल लोटळे यांना शंका आली म्हणून त्यांनी घरामध्ये बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले. त्यामध्ये पहाटेच्या सुमारास बिबटया कुत्र्याला घेवून गेल्याचे दिसून आले. ही बाब वनविभागाचे काळगावचे अधिकारी श्री.सुतार, नथुराम साहेब, मुबारक मुल्ला यांना सांगितल्यानंतर त्यांनी जागेवर येवून पाहणी केली आहे. मात्र या प्रकारामुळे लोकांच्या एकच घबराट उडाली आहे.
एरवी रानामध्ये चरावयास सोेडलेल्या जनावरांवरती बिबटयाने हल्ला केल्याच्या घटना कळत होत्या. परंतू गावामध्ये येवून घरातून, गोठयात बिबटयाचा वावर वाढला असल्याने वनविभागाने अशा  घटनांकडे गांभीर्याने पहावयास हवे आहे. अन्यथा मोठा अनर्थ घडू शकतो.
मानवी वस्तीनजिकचा बिबटयाचा नित्य वावर नागरिकांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. अनेक गावांत बिबटयाची डरकाळी नित्याची झाली असून यामध्ये शेतकऱ्यांचे पशुधन नष्ट होत आहे. बिबटयाचे हल्ले रोखण्यासाठी वनविभागाने व्यापक प्रयत्न करण्याची गरज विभागातील शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
चौकटीत : मानवी वस्तीनजिकचा बिबटयाचा वावर नित्याचाच
काळगाव विभागातील अनेक गावांतील पाळीव प्राण्यांवर बिबटयाने हल्ले करुन त्यांना ठार केल्याचे प्रकार सतत घडत आहेत. यापूर्वी बिबटयाचा वावर होता परंतू पुरावा नव्हता. रात्री बिबटयाने आमच्या पाळीव कुत्रयाला पळवून नेतानाचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. वन विभागाने परिसरात वावरत असलेल्या बिबटयाचा बंदोबस्त करुन लोकांच्यात पसरलेली भिती टाळावी.
-अनिल लोटळे

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न