५१ व्या पाटण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे चांद्रयानाच्या उड्डाणाने उद्घाटन
तळमावले/वार्ताहर
बालवयातच मुलांना विज्ञानाची गोडी लागावी व कर्तृत्वाची उत्तुंग उडी घेता यावी आणि विज्ञानातील अविष्काराचा मानवी जीवनात सकारात्मक परिणाम व्हावा आणि विविध अविष्काराचे मंत्र, तंत्र हे विज्ञानाच्या किमयेत दडले आहे याची जाणीव बालकांना व्हावी यादृष्टीने सातारा जिल्हा परिषद,सातारा व पंचायत समिती, पाटण तसेच श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित श्री वाल्मिकी विद्यामंदिर तळमावळे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत व डॉ.सौ. प्राची नरेंद्र पाटील यांच्या हस्ते कळ दाबून चांद्रयान प्रतिकृतीच्या उड्डाणाने उदघाटन करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. प्राची पाटील यांनी विज्ञान म्हणजे काय? हे सोदाहरण स्पष्ट करून ग्रामीण भागात एवढ्या उच्च गुणवत्तेच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन डोळ्याचे पारणे फेडणारे आणि शहरी भागातील शाळांना विचार करायला लावणारे आणि आम्हा शहरवासीयांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे असेच आहे. माझ्याच तालुक्यातील एवढ्या दर्जेदार प्रदर्शनाचे उदघाटन करण्याचा मान मला मिळाला हे माझे भाग्यच आहे .माझ्या डोंगरदऱ्यांच्या ग्रामीण भागात एवढी विद्वत्ता ठासून भरली आहे ही एक अभिमानाची बाब आहे आणि याच तालुक्यातील आणि भागातील भूमिपुत्र श्री.अमोल यादव यांनी भारतातील स्वदेशी बनावटीचे विमान तयार केले त्यांच्यासारखेच संशोधक अशा प्रदर्शनातून तयार होतील असा आशावाद व्यक्त केला.
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सातारा जिल्हा विभाग प्रमुख श्री.अरुण कुंभार यांनी अशा प्रकारच्या विज्ञान प्रदर्शन आयोजनाचा मान आमच्या संस्थेला दिल्याबद्दल जिल्हा परिषदेने पंचायत समिती यांना धन्यवाद दिले फक्त साहित्य मांडणी न होता त्याचा समाजासाठी उपयोग व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रदर्शनात तालुक्यातील सुमारे २०० च्या वर शाळांनी सहभाग नोंदविला आहे.
तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी दीपा बोरकर मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्तावित केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि स्वागत जगणी सर यांनी केले उपस्थितांचे आभार श्री विद्यालयाचे मुख्याध्यापक सावंत यांनी मानले व उद्या प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील त्याचा लाभ परिसरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहनही केले.

Comments
Post a Comment