पाटण तालुक्यातील २६ पैकी २० ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा झेंडा


पाटण /वार्ताहर

            पाटण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. निवडणूक झालेल्या एकूण १७ पैकी ११ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामस्थांनी शिवसेना पक्षाच्या बाजूने कौल दिला असून या निवडणुकीआधी ९ ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेची बिनविरोध सत्ता स्थापन झाली आहे. पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली लढवण्यात आलेल्या या निवडणुकीत एकूण २६ पैकी २० ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला आहे.

        पाटण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीद्वारे शिवसेना-देसाई गटाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व दाखवून दिले आहे. एकूण २६ पैकी २० ग्रामपंचायतींमध्ये ग्रामस्थांनी शिवसेनेच्या बाजूने निर्विवाद कौल दिला आहे. निवडणुकीआधीच गमेवाडी, गुंजाळी, उधवणे, नवसरवाडी, येराडवाडी, डावरी, चौगुलेवाडी सांगवड, गव्हाणवाडी, निवी या ग्रामपंचायतींमध्ये शिवसेना-देसाई गटाची बिनविरोध सत्ता स्थापन झाली आहे. रविवारी, ५ नोव्हेंबर रोजी उर्वरित १७ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. सोमवारी जाहीर झालेल्या निकालात १७ पैकी कळकेवाडी, जमदाडवाडी, मरळी, किल्ले मोरगिरी, जिंती, कुसरुंड, बेलवडे खुर्द, मंद्रूळ कोळे, शितपवाडी, मल्हारपेठ, गावडेवाडी या ११ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामस्थांनी शिवसेना-देसाई गटाच्या बाजूने कौल दिला आहे. यामुळे २६ पैकी २० ग्रामपंचायतींवर शिवसेना-देसाई गटाची सत्ता स्थापन होईल. या २० पैकी ८ ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर करून शिवसेना-देसाई गटाने सत्ता खेचून आणली आहे. यात मल्हारपेठसारख्या महत्त्वाच्या ग्रामपंचायतीचाही समावेश आहे. या निवडणुकीत शिवसेना-देसाई गटाचे एकूण २० सरपंच व १२७ सदस्य निवडून आले आहेत.

        या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाटणकर गटाकडे केवळ ३, तर काँग्रेस, स्थानिक आघाडी व महाविकास आघाडी यांना प्रत्येकी १ ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवता आली आहे.
        पाटणच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी घेतलेल्या अनेक लोकहिताच्या निर्णयांना आणि ते करत असलेल्या भरीव विकासकामांना पाटणच्या जनतेने या निकालाद्वारे कौल दिला आहे, अशी भावना पाटणवासीय व्यक्त करत आहेत. मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या गतिमान नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय पाटणवासीयांनी घेतला आहे, हे या ग्रामपंचायत निकालातून अधोरेखित झाले आहे.

        निकालानंतर सर्व नवनिर्वाचित सरपंच व सदस्य, तसेच सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते यांचे पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी मुंबई येथून अभिनंदन करून सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पाठीशी ठामपणे उभे राहिलेल्या सर्व पाटणवासीय ग्रामस्थांचे आभार व्यक्त करून पाटणच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचा विश्वास पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी व्यक्त केला आहे.
        निकालानंतर नवनिर्वाचित सदस्य व सरपंच यांचे दौलतनगर-मरळी येथे मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. रविराजदादा देसाई अभिष्टचिंतन केले. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. यशराजदादा देसाई यांनीदेखील सर्व नवनिर्वाचित सदस्य व सरपंच यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न