मुलींना ठेवपावती देवून जपल्या आईच्या स्मृती



तळमावले/वार्ताहर
दोन वर्षापूर्वी दिनकर रामिष्टे यांच्या आईचे आकस्मात निधन झाले. त्यामुळे रामिष्टे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. आईचे निधनाचे दुःख बाजूला ठेवून रामिष्टे परिवाराने जपलेली सामाजिक बांधिकली समाजाला दिशा देणारी आहे. आईच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांनी आपल्या गावामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीच्या नावावर प्रत्येकी रु.1000 ची दामदुप्पटची ठेवपावती करण्याचा संकल्प केला आहे. या ठेवपावती देवून दिनकर रामिष्टे यांनी आपल्या आईच्या स्मृती चिरंतन जपण्याचा प्रयत्न केला आहे. सदर ठेवपावतीमुळे मुलींच्या उज्जवल भविष्यासाठी नक्कीच हातभार लागेल. याप्रसंगी ठेवपावती स्वीकारलेल्या मुलींच्या परिवारातील सदस्यांनी रामिष्टे परिवाराचे आभार मानले आहेत.आतापर्यंत सुमारे 20 मुलींच्या नावे त्यांनी ठेवपावती केली आहे.
काही दिवसापुर्वी दिनकर रामिष्टे यांच्या आईचे व्दितीय पुण्यस्मरण झाले. यावेळी रामिष्टे परिवाराने काळेवाडी, रामिष्टेवाडी या वाडीत जन्मलेल्या मुलींच्या नावावर रु.1000 ची दामदुप्पट ठेवपावती करून त्या कुटुंबातील सदस्यांना सुपुर्द केली. तसेच अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, हायस्कूल, पतसंस्था इ.ना महापुरुषांच्या प्रतिमा, शैक्षणिक साहित्य आणि मुलांना खाऊ वाटप केले. सामाजिक बांधिलकी जपून राबवलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असाच आहे.
दरम्यान, त्या दिवशी सकाळी ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक ह.भ.प.विजय महाराज रामिष्टे यांचे कीर्तन संपन्न झाले. त्यानंतर या शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा तसेच गावातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. तसेच यशोदा रामिष्टे यांच्या स्मरणार्थ काढलेल्या दिनदर्शिकेचे वितरण देखील यावेळी केले.
दिनकर रामिष्टे हे कोयना सहकारी बॅंक हेड ऑफिस कराड येथे शाखाधिकारी म्हणून कार्यरत आहेत तर वडील श्री.नामदेव विष्णू रामिष्टे हे पाटण तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य होत. रामिष्टे परिवाराने राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

चौकट : समाजाचे देणे लागतो या भावनेतून उपक्रम
पत्नीच्या आकस्मिक जाण्याचे दुःख अजूनही आमच्या कुटूंबावर आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून हा उपक्रम राबवला असल्याचे मत कै.यशोदा रामिष्टे यांचे पती नामदेव रामिष्टे यांनी यावेळी व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न