शिबेवाडीत साकारलेय पाटण तालुक्यातील सर्वात मोठे शेततळे
- Get link
- X
- Other Apps
तळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील शिबेवाडी (वरची) गुढे येथील माळरानावर एक अवाढव्य शेततळे साकारले आहे. डोंगरावरील सुमारे 25 लोकांनी एकत्र येवून आई काळंबा देवी ॲग्रो या कंपनीची निर्मिती केली आहे. त्यांनी अथक परिश्रमातून हे शेततळे तयार केले आहे. या शेततळयाचा आकार 80 बाय 65 मीटर आहे. त्याचा शुभारंभ दि. 6 मार्च, 2025 रोजी शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार ॲड.जनार्दन बोत्रे यांच्या हस्ते झाला. सुमारे 3 महीने दिवस काम सुरु होते. 100 कामगार यामध्ये काम करत होते. या शेततळयामध्ये 2.5 कोटी लिटर पाण्याचा संचय होणार असून त्यामुळे 35 एकर क्षेत्र पाण्याखाली येणार आहे. हे शेततळे ग्रॅव्हीटीच्या उतारावरील पाण्याने भरणार आहे. सदर शेततळे हे पाटण तालुक्यातील सर्वात मोठे असल्याचा दावा या शेतकऱ्यांनी केला आहे. शिबेवाडी ते कोळपे माळ-मारुती मंदीर या ठिकाणचा पाणंद रस्त्याला निधी राज्याचे पर्यटन मंत्री आणि जिल्हयाचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी दिल्यामुळे शेततळयाचे काम करण्यास गती मिळाली आहे.
या शेततळयातील पाण्याचे पुजन नुकतेच जागतिक पर्यावरण दिन आणि गंगादशहरा समाप्ती दिनादिवशी मोठया उत्साहात झाले. यावेळी शेतीमित्र संदीप डाकवे, धर्मेद्र पाटील, आबासाहेब शिबे, विनोद शिबे, प्रकाश पुजारी, भगवान महाडीक, दत्तात्रय शिबे, दिलीप जाधव, जगन्नाथ शिबे, ज्ञानदेव मोहिते, चंद्रकांत महाडीक अन्य ग्रामस्थ व महिला वर्ग यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी या डोंगरावरील लोकांचे चेहरे आनंदाने फुललेले पहायला मिळाले. स्वप्न पूर्ती होत असतानाची चमक त्यांच्या डोळयांमध्ये दिसत होती.
तालुक्यातील बहुतांशी शेती ही पावसावरील पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे चरितार्थ चालवण्यासाठी अनेक मंडळी पोटापाण्यासाठी मुंबईला जात आहे. परंतू शेतीमध्ये काहीतरी प्रयोग करण्याच्या दृष्टिकोनातून आई काळंबा देवी ॲग्रो यांनी केलेले प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आहेत. या शेततळयामुळे पावसाळयात ओसाड दिसणारी शेती उन्हाळयात हिरव्यागार पिकाने भरलेली दिसतील. तसेच 100 पेक्षा जास्त लोकांना या ठिकाणी रोजगार मिळाल्यामुळे त्यांची मुंबई व अन्य ठिकाणी जाणारी परवड आपोआपच थांबेल. सदर तळयाचा आकार आणि खोली मोठी असल्याने काही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी चारही बाजूने तारेचे कुंपन आणि झटका मशीनचे नियोजन केले आहे. तसेच सौर उर्जेवर चालणारा एक स्वयंचलित सीसीटीव्ही कॅमेरा देखील बसवण्यात आला आहे.
सन 2022 ते 2024 या सालामध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी योजनेंतर्गत सातारा जिल्हयामध्ये सुमारे 283 शेततळी आहेत. त्यामध्ये माण तालुक्यात सर्वाधिक 85 तर वाई आणि कराडमध्ये सर्वात कमी म्हणजे प्रत्येकी 8 शेततळी आहेत. तर पाटण तालुक्यात 11 शेततळी आहेत. मात्र हे तळे वैयक्तिक पैशातून बांधले आहे. या शेततळयामुळे सुमारे 20 वर्षापूर्वी पडीक असलेले रान लागवडीखाली येण्यास मदत होण्यास झाली आहे.
ध्येय, चिकाटी आणि योग्य नियोजन असेल तर यशस्वी होता येते. याचा संदेश या शेतकऱ्यांनी दिला आहे. या ठिकाणी ड्रॅगन फ्रुट, मोरींगा पावडर व अन्य स्थानिक पिके घेण्यात येणार असून भविष्यामध्ये या ठिकाणी कृषी पर्यटन करण्याचा मानस शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. सदर शेतकऱ्यांच्या शेततळयाचे पहिले पाउल यशस्वी झाले असून आगामी योजनेत देखील ते यशस्वी ठरतील यात शंका नाही.
गावच्या मातीची ओढ कायम
आई काळंबा देवी ॲग्रो कंपनीचे अध्यक्ष आबासाहेब शिबे हे मुंबईला काम करत असतात. मात्र आपल्या गावातील मातीसाठी काहीतरी केले पाहिजे ही त्यांची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नाही. नेहमीच ते विविध उपक्रम राबवत असतात. काळंबादेवी चॅरिटेबल ट्रस्टचे ते अध्यक्ष आहेत. काही वर्षापूर्वी त्यांनी आपल्या बहिणीच्या लग्नात जमलेल्या आहेराची रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना.शंभूराज देसाई यांच्या हस्ते जलयुक्त शिवार अभियान या जलंसंधारणाचे काम करणाऱ्या योजनेला दिली होती.
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment