बादेवाडी येथे बिबटयाच्या हल्ल्यात शेळी ठार

 तळमावले/संदीप डाकवे

पाटण तालुक्यातील बादेवाडी येथील आनंदा म्होप्रेकर यांच्या शेळीवर रात्री बिबटयाने हल्ला करुन तिला ठार केले आहे. काल (रविवार दि.10 मार्च रोजी) पहाटे 1.30 च्या दरम्यान ही घटना घडली. आनंदा म्होप्रेकर हे अपंग आहेत.

या आठवडयातील ही दुसरी घटना आहे. काही दिवसापूर्वी सुनील आत्माराम पवार यांच्या घराच्या गच्चीवर बिबटयाने पाळीव कुत्र्याला हल्ला करुन ठार केले आहे. भर वस्तीत अशा घटना घडल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे. आज येथे तर उद्या दुसरीकडे बिबटया दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामस्थ अक्षरशः  हैराण झाले आहेत. 

सध्या सुगीचे दिवस असल्यामुळे शेतातील पीके काढणीच्या अंतीम टप्प्यावर आले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग डोळयात तेल घालून रात्रंदिवस पिकाची राखण करत आहे. मात्र बिबटयाच्या दहशतीमुळे शेतकरी वर्ग पुरता घाबरुन गेला आहे. एरवी रानामध्ये चरावयास सोेडलेल्या जनावरांवरती बिबटयाने हल्ला केल्याच्या घटना कळत होत्या. परंतू गावामध्ये येवून घरातून, गोठयात बिबटयाचा वावर वाढला असल्याने वनविभागाने अशा घटनांकडे गांभीर्याने पहावयास हवे आहे. अन्यथा मोठा अनर्थ घडू शकतो.

यापूर्वीही बादेवाडी व परिसरातील शिवारामध्ये बिबटयाचा वावर वाढला असून अनेकवेळा शेतकऱ्यांना बिबटया दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली असून या परिसरात सातत्याने बिबटयाने शेतकऱ्यांच्या  शेडमधील जनावरे, कोंबडया पाळीव श्वान यांच्यावर हल्ले करुन त्यांना फस्त केले आहे. परिसरामध्ये बिबटयाच्या पायाचे ठसे आढळून येत आहेत. मानवी वस्तीनजिकचा बिबटयाचा नित्य वावर नागरिकांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. अनेक गावांत बिबटयाची डरकाळी नित्याची झाली असून यामध्ये शेतकऱ्याचे पशुधन नष्ट होत आहे. बिबटयाचे हल्ले रोखण्यासाठी वनविभागाने व्यापक प्रयत्न करण्याची गरज विभागातील शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

भरपाईची मागणी :

या  विभागातील अनेक गावांतील पाळीव प्राण्यांवर बिबटयाने हल्ले करुन त्यांना ठार केल्याचे प्रकार सतत घडत आहेत. वन विभागाने परिसरात वावरत असलेल्या बिबटयाचा बंदोबस्त करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई द्यावी अशी मागणी बाधित शेतकरी वर्गातून होत आहे.

वनहद्दीतील अतिक्रमणाचा परिणाम -

अनेक वर्षापूर्वीची बेसुमार वृक्षतोड, अवैध शिकार रोखण्यात वनविभाग कुचकामी ठरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जंगले नष्ट होत आहेत. जंगलातील अन्नसाखळी विस्कळीत झाली आहे. प्राण्यांच्या क्षेत्रावर मानवाने केलेले अतिक्रमणाचे दृष्य तर भयानक आहे. त्याचा परिणाम सध्या लोकवस्तीच्या गावांमध्ये जाणवत आहे. जंगली श्वापदांचा मोर्चा अन्न, पाण्यासाठी मानवी वस्तीकडे वळत आहे.

-सुनील पवार

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न