महाविद्यालयीन जीवन आयुष्याला कलाटणी देणारा महत्वपूर्ण टप्पा - डॉ.उषादेवी साळुंखे
तळमावले
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले व काकासाहेब चव्हाण कॉलेज, माजी विद्यार्थी मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने अकरावी आर्टस, कॉमर्स अॅन्ड सायन्स व बी. ए., बी. कॉम, बी. एस्सी. भाग एक या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय युवा दिन, नवागतांचे स्वागत व शैक्षणिक साहित्य वाटप समारंभ स्वागतपर कार्यक्रम संपन्न झाला. या समारंभासाठी श्री. हेमंत तुपे (महाव्यवस्थापक शिवसमर्थ मल्टीस्टेट को-ऑप सोसायटी लि. तळमावले) यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच श्री.बाळकृष्ण सावंत (सदस्य, महाविद्यालय विकास समिती), प्रा.अधिकराव कणसे, प्रा. यु.आर.माने, श्री.अरूण शिबे, श्री.रमेश मोरे, श्री.आनंदराव साळुंखे, महाविद्यालयातील गुरुदेव कार्यकर्ते, विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. याप्रसंगी श्री. बाळकृष्ण सावंत, प्रा.अधिकराव कणसे, प्रा.यु.आर माने यांनी विद्यार्थ्यांना मौलिक, प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
प्र. प्राचार्या डॉ. उषादेवी साळुंखे म्हणाल्या, माजी विद्यार्थी मंडळाने आजी विद्यार्थ्यांचा सन्मान करणे हा दुग्धशर्करा योग आहे. महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी माजी विद्यार्थी मंडळाचे कार्य मोलाचे आहे. विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्या म्हणाल्या, महाविद्यालयीन जीवन आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा महत्वपूर्ण टप्पा आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचे काम प्राध्यापक करत असतात. विद्यार्थ्यांनी देखील राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा सहभाग किंवा महाविद्यालयाकडून जे वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. अशा उपक्रमांमध्ये हिरीरीने सहभागी असणे आवश्यक आहे. अशा उपक्रमांमधुनच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, सामाजिक व बौद्धिक विकास होत असतो. महाविद्यालयात मुलींच्या सुरक्षेसाठी शिस्त समिती तसेच ढेबेवाडी पोलिस स्टेशनचे अधिकारी सदैव तत्पर असतात. शिस्तपालनासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन ओळखपत्र अनिवार्य आहे.
महाविद्यालयाच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडतात. विद्यार्थी-शिक्षक संवादातून प्रश्र्नांची उकल होत असते. महाविद्यालयात विविध शासकीय शिष्यवृत्ती योजना प्रभावीपणे राबविल्या जातात. कौशल्याधारित विविध कोर्सच्या माध्यमातून मुलींसाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. अशा उपक्रमांमध्ये मुलींनी सहभाग घेऊन आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे. प्रा.अधिकराव कणसे म्हणाले, स्वामी विवेकानंदांचा आदर्श युवकांनी समोर ठेवावा. तरुणाई म्हणजे ज्यांच्या हातात सत्ता, हृदयामध्ये ऊर्जा आणि डोळ्यात स्वप्ने असतात. यशस्वी होण्यासाठी वाटचाल करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संकटाना कधीच घाबरू नये. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर मर्यादित करणे आणि ग्रंथाशी मैत्री वाढविणे गरजेचे आहे. व्यक्तिमत्व विकासासाठी खेळाचे महत्व अनन्यसाधारण आहे. प्रचंड कष्ट, सातत्यपूर्ण अभ्यास करुन आई - वडील, गुरुजन, कॉलेज, आपला गाव व देशाचे नाव उज्वल करा. यावेळी *माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष मा. राजाभाऊ माने तसेच सर्व कार्यकारिणी सदस्य यांच्या आर्थिक योगदानामधून नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत वही, पेन देऊन करण्यात आले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी मंडळाचे सर्व पदाधिकारी, तसेच प्रभारी प्राचार्या डॉ.उषादेवी साळुंखे यांचे मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ. विक्रांत सुपुगडे, सांस्कृतिक विभागातील सदस्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. गवराम पोटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सौ. बी. एस. सालवाडगी, प्रा. डॉ. रोहिणी हाके यांनी केले. तर आभार प्रा. डी. एच. रास्ते यांनी मानले.

Comments
Post a Comment