शिक्षकाने गुणवान विद्यार्थी घडविणे हे खरे पुण्यकर्म असते - प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे
तळमावले/वार्ताहर
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे काकासाहेब चव्हाण कॉलेजचे प्राचार्य डॉ. अरुण गाडे हे ३७ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३० जून, २०२४ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. या निमित्ताने बुधवार दि. २६ जून, २०२४ रोजी सकाळी १०.३० वा. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्राचार्य डॉ. अरूण गाडे यांचा सेवा गौरव व 'मी वादळ वारा' गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन आणि शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थनेने झाली. समारंभाच्या अध्यक्षस्थानी मा. प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ (सहसचिव (प्रशासन), श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर) हे होते. समारंभाचे प्रमुख पाहुणे मा.प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे (सुप्रसिद्ध व्याख्याते व विचारवंत) उपस्थित होते. या समारंभासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये मा. एस. के. कुंभार (माजी सहसचिव (अर्थ) श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर), मा.आर.के. भोसले (माजी सहसचिव (प्रशासन) श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर), मा.प्राचार्य सुहास साळुंखे (माजी सदस्य व्यवस्थापक मंडळ, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर), मा.प्रभारी प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड (सदस्य, व्यवस्थापक मंडळ, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर), प्राचार्य पुरूषोत्तम शेठ, प्राचार्य प्रो.डॉ. सतीश घाटगे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ.अरूण गाडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. व स्टाफच्या वतीने विठ्ठल रुक्मिणीची सुंदर मूर्ती देऊन गौरविण्यात आले. प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे म्हणाले, डॉ . बापूजी साळुंखे व थोर देशभक्त काकासाहेब चव्हाण या थोर विभूतींनी तळमावल्याच्या टेकडीवर ज्ञानमंदिर उभारून वांग खोऱ्याचा संपूर्ण परिसर बौद्धिकदृष्टया संपन्न केला. शिक्षकाने गुणवान विद्यार्थी घडविणे हे खरे पुण्यकर्म असते. चैतन्याने उसळणारे तळमावले हे हिरवे बेट अनेकजणांच्या कष्टातून उभे राहिले आहे. डॉ.बापूजी साळुंखे यांच्या थोर कार्यामुळे प्राचार्य डॉ.अरूण गाडे यांच्यासारखे सर्वसामान्य, गोरगरीब कुटुंबातील अनेकजण पुढे आले. हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणारे प्राचार्य डॉ.अरुण गाडे यांनी विविध सामाजिक चळवळींमध्येही मोठे योगदान दिले आहे. त्यांचे जगणे संघर्षाची गाथा आहे. 'वादळ वारा ' या स्मरणिकेविषयी बोलताना ते म्हणाले, 'माणसांना मृत्यु असतो. ग्रंथांना आयुष्य असते.
'वादळ वारा' ही स्मरणिका साहित्यविश्वात चिरंतन ठरेल. राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिनी होत असलेला सेवानिवृत्तीचा कार्यक्रम ही गाडे सरांची वैचारिक बांधिलकी आहे. त्यांनी आपल्या सेवा काळात विद्यापीठाच्या विविध समित्यांवर चोखपणे काम केले आहे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या श्रीमती मिनलबेन महेता कॉलेज, पाचगणी व काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले या दोन शाखांवर जवळपास पंधरा वर्षे प्राचार्य म्हणून चांगले कार्य केले. प्राचार्य डॉ.अरूण गाडे यांची सेवानिवृत्ती व 'मी वादळ वारा' या गौरव ग्रंथाचे प्रकाशन सोहळ्यासाठी प्राचार्य डॉ.अरुण गाडे यांचे अनेक विद्यार्थी, मित्रपरिवार, नातेवाईक या निमित्ताने उपस्थित होते.
प्राचार्य डॉ.अरूण गाडे यांनी आपल्या मनोगतातून, प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन प्राचार्य पदापर्यंतचा संघर्षमय जीवनप्रवास उलगडून सांगितला. महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ.अशोक चौसाळकर यांचे मार्गदर्शनाखाली पूर्ण केलेले पीएच. डी. पदवीचे संशोधन कार्य माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे ते म्हणाले. यापुढे सामाजिक, शैक्षणिक कार्यात अग्रेसर राहण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमात प्राचार्य पुरुषाेत्तम शेठ, प्राचार्य सुहास साळुंखे, दीक्षा गाडे, गाथा गाडे, श्री. राजू दोडमणी, प्रा. सुरेश पाटील, प्रा. सौ. मीनाक्षी पाटील मॅडम, प्रा. डॉ. राजाराम कांबळे या मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. तसेच मा.ना.श्री.रामदासजी आठवले ( केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री), मा. प्रा जोगेंद्र कवाडे ( माजी खासदार व माजी विधानपरिषदेचे आमदार ) यांनी पाठविलेल्या शुभसंदेशाचे वाचनही यावेळी करण्यात आले. प्राचार्य अभयकुमार साळुंखे (कार्याध्यक्ष, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर), प्राचार्या शुभांगीताई गावडे ( सचिवा, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर), कौस्तुभ गावडे (मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर) यांनी प्राचार्य गाडे सरांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या समारंभासाठी प्राचार्य डॉ.अरूण गाडे सरांचे आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ संभाजी नाईक यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. महेश चव्हाण यांनी करुन दिला. सूत्रसंचालन प्रा.सचिन पुजारी, प्रा. सौ. ज्योती बाऊचकर यांनी केले. आभार प्रा. डॉ. उषादेवी साळुंखे यांनी मानले.

Comments
Post a Comment