स्वकल्पनांना शब्दबद्ध करणारी मुलं भविष्यातील समृद्ध नागरिक असतील : दीपा बोरकर

पाटण/वार्ताहर

                सातारा जिल्ह्याचे कोकण वाटावे  ..इतका हिरवाईचा प्रसन्न तालुका ! तारळी, कोयना आणि वांग या तीन नद्यांनी लाडावून नटवलेला  समृद्ध, निसर्गदेवतेचा वरदहस्त लाभलेला तालुका. पावसाळ्यात कडेपठारांवरुन हजारो मोठमोठे नाले, धबधबे अंगाखांद्यावर खेळवणारा देखणा तालुका. या तालुक्यातील कोयनेच्या काठावरची शाळा, जिल्हा परिषद शाळा मुळगाव. जिल्हा परिषद शाळा मुळगाव या शाळेतील संवेदनशील लेकरांनी लिहिलेल्या या सुंदर गोष्टी. या पुस्तकाची बीजं पेरली होती श्री.सदानंद कदम, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक यांनी पाटण तालुक्यात शिक्षकांसाठी घेतलेल्या कार्यशाळेतून. अविश्वसनीय इतका सूक्ष्म अभ्यास, ज्यांच्या अक्षरांपुढे मोतीही थोडे कमी देखणे वाटावेत इतके  सुंदर हस्ताक्षर आणि तितकाचं प्रचंड इतिहासाचा व्यासंग. या कार्यशाळेने आम्हाला संपन्न  तर केलेचं परंतु आपण कुठे आहोत याची लख्ख जाणीवही झाली. सुंदर हस्ताक्षर आणि शुद्धलेखन यासाठी पाटण तालुक्यातील निवडक जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची कार्यशाळा संपन्न झाली आणि एक गोष्ट लक्षात आली ..इथली जमीन, इथलं वातावरण, इथले शिक्षक संस्करक्षम आहेत. इथला निसर्ग पाहून मला ब-याचदा वाटतं की इथे काहीही पेरलं तर ते उगवतं. नुसत उगवत नाही तर समृद्ध होतं वाढतं. अगदी तसंच इथल्या शिक्षकांबाबतही म्हणता येईल. 

        श्री.सदानंद कदम, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक यांनी घेतलेल्या कार्यशाळेनंतर या क्षमतेवर शिक्कामोर्तब झालं. सुंदर हस्ताक्षर, शुद्धलेखन यावर काम सुरू असतानाच श्री .नामदेव माळी, सहसंचालक, SCERT पुणे यांनी पाटण तालुक्यासाठी 'चला लिहूया' या संकल्पनेवर काम करण्यासाठी आम्हां सर्वांनाचं प्रोत्साहित केलेलं होतं.आणि या प्रोत्साहनाचं मूर्त रुप साकारलं 'चला लिहूया' या तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या निवडक चाळीस शिक्षकांच्या कार्यशाळेतून- श्री.नामदेव माळी साहेब यांनी एक पूर्ण दिवस ही कार्यशाळा घेतली. संपन्न, सुंदर आणि अनुभवांची साखरपेरणी असणारी ही कार्यशाळा पाटण तालुका शिक्षण विभाग आणि शिक्षकांसाठी संजीवनी ठरली. पहिल्या कार्यशाळेनंतर या चाळीस शिक्षकांच्याकडून विविध चित्रांचा संग्रह, चित्रावरुन शब्दलेखन, वाक्यलेखन परिच्छेदलेखन इ.वर काम सुरू केलेलं होतं. चार महिन्यानंतर श्री.नामदेव माळी साहेबांची दुसरी कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत चित्रांवरुन गोष्ट यावर मार्गदर्शन, प्रत्यक्ष अनुभव अशी व्याप्ती वाढवली गेली. सौ.सुलोचनादेवी पाटणकर कन्या शाळेच्या मुख्याध्यापक सौ.पाटणकर मॕडम यांनी या दोन्हीही कार्यशाळांसाठी इमारत आणि भौतिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या. या दुस-या कार्यशाळेनंतर या निवडक शिक्षकांच्या वर्गात जुन्या पाठ्यपुस्तकातील, वर्तमानपत्रातील इ.चित्रं कापून ठेवणं. या चित्रांचा अभ्यास करणं आणि या चित्रांवरून स्व अनुभवावर आधारित, आपल्या कल्पनेतील गोष्ट लिहून घेणं हे कामं सुरु झालं. 

          सौ.योगिता बनसोडे ,या जिल्हा परिषद शाळा मुळगाव ता.पाटण येथे प्राथ.पदवीधर पदावर कार्यरत आहेत. श्रीम.योगिता बनसोडे मॕडम या दोन्ही कार्यशाळेसाठी उपस्थित होत्या. मॕडमची चिकाटी ,शिकण्याची जिद्द, शिक्षक म्हणून नेहमी काहीतरी उत्कृष्ट करण्याची धडपड मी नेहमी पाहिली आहे. इथेही पुन्हा या सर्व बाबी घडून आल्या. सौ.योगिता बनसोडे मॕडम यांनी सदानंद कदम आणि श्री.नामदेव माळी यांच्या कार्यशाळेत प्रेरणा घेऊन 'चला लिहूया' या संकल्पनेवर वर्षभर काम केलं. मुलांकडून चित्रांवरुन गोष्टी लिहून घेणे, तपासणे, दुरुस्ती करणे, पुन्हा लिहायला लावणे, पुन्हा तपासणे या बाबी म्हणाव्या तितक्या सोप्या नसतात. परंतु सौ.बनसोडे मॕडम यांनी मुलांवर ज्या चिकाटीने कामं केलं आणि मुलांनी ज्या चिकाटीने लेखन सुरू ठेवलं. या दोन्ही बाबी नक्कीच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहेत. 

          यातूनच मग 'चला लिहूया' या संकल्पनेतून मुलांनी लिहिलेल्या निवडक गोष्टींचे पुस्तक तयार करता येईल का? हा विचार मनात सुरु होताचं. श्री.अमेय जोशी सर, काका यांच्याशी याबाबत बोलणं झालं आणि दोघांचाही होकार  मिळाला.  आपण पुस्तकं वाचतो ,पाठ्यपुस्तकं वाचतो. या पुस्तकात लेखकांचं नाव असतं .परंतु लेखक म्हणून आपलंही नाव येऊ शकतं. आपणही सुरेख लिहू शकतो, आपलं पुस्तक तयार होऊ शकतं, हा विश्वास मुलांना मिळाला तरीही या सर्व प्रयत्नांना लाख मोलाचं यश मिळालं, असं मला वाटतं. पाटण तालुक्यात शाळाभेटीसाठी किंवा कार्यालयीन भेटींसाठी आलेल्या सन्माननीय अधिकारी ,सन्माननीय पदाधिकारी यांचे स्वागत आम्ही पुस्तक देऊन करतो. 

        इथून पुढे फक्त एक बदल होईल, स्वागतासाठीचे पुस्तक पाटण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी लिहिलेले असेल. ही सुरूवात आहे. मुळगावच्या विद्यार्थिनींनी हा बहुमान पटकावला आहे. आता इतर शाळांमधून मुलं लिहिती होत आहेत. एक सुंदर बदल घडून येतो आहे. वाचू शकणारं आणि स्वतःची कल्पना प्रत्यक्षात कागदावर मांडू शकणारं मुलं पुढील  आयुष्यात नक्कीच समृद्ध नागरिक असेल याची खातरी आहे.

        पाटण तालुक्यातील लेकरांचं हे पहिलं पुस्तक असावं. यानंतर तालुक्यातील ब-याच शाळांमधून विद्यार्थी लिहिताना दिसत आहेत, ही बाब खूप समाधान देणारी आहे. यासाठी मुळगावमधील शिक्षक आणि पालक यांनी केलेलं सहकार्य खूप महत्त्वाचं आहे. 

          मुलांना लिहितं करण्यासाठी आमच्या पाठीशी आपले सर्व ज्ञान आणि अनुभव घेऊन लढ म्हणणारे श्री.सदानंद कदम आणि श्री.नामदेव माळी  यांचे आम्ही सदैव ऋणी आहोत. लेखनाच्या या अकल्पित तरीही सुंदर प्रवासात चिकाटीने काम करणाऱ्या सौ.योगिता बनसोडे या पुस्तकाच्या वयाने लहान असल्या तरी समृद्ध अशा  दहा लेखिका, (ज्या आता इंग्रजीतही गोष्टी लिहित आहेत) , पाटण तालुक्यातील माझे सर्व सहकारी, माझे सर्व शिक्षक यांची मी ऋणी आहे.

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न