घरचे मंगलकार्य आटोपताच पालकमंत्री शंभूराज देसाई दुसऱ्या दिवसापासून कामात व्यग्र !
मंगळवारी विविध प्रश्नांबाबत आढावा बैठका घेऊन जिल्हा प्रशासनाला दिले निर्देश
सातारा (३० जानेवारी २०२४) : सुपुत्र यशराज देसाई यांच्या विवाह कार्यानिमित्त गेले चार दिवस कौटुंबिक आघाडीवर व्यग्र राहिलेले पालकमंत्री शंभूराज देसाई मंगळवारपासून पुन्हा सक्रिय झाले. कुटुंबात दीर्घ कालावधीनंतर संपन्न झालेले मंगलकार्य आटोपताच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मंगळवारी तातडीने जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत प्रशासनाच्या बैठका घेऊन आवश्यक ते निर्देश दिले. कौटुंबिक जबाबदारीबरोबरच जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कर्तव्य बजावण्यात कोणतीही कसर न राखणारे शंभूराज देसाई यांच्या क्रियाशील नेतृत्वाबद्दल जिल्हावासीयांकडून कौतुक व्यक्त केले जात आहे.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या शिंदे-देसाई कुटुंबात दीर्घ कालावधीनंतर रविवारी, २८ जानेवारी रोजी सनईचौघडे वाजले. त्यांचे सुपुत्र आणि लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांचा शुभविवाह दौलतनगर येथे रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शिंदे-देसाई कुटुंबातील पुढच्या पातीचा शाही विवाह सोहळा राज्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, सहकार, शिक्षण, प्रशासन आदी क्षेत्रांतील मान्यवर आणि जिल्ह्यातील हजारो नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. वरपिता म्हणून या विवाह सोहळ्याच्या नियोजनात पालकमंत्री शंभूराज देसाई व्यग्र होते. मात्र विवाह सोहळा व कौटुंबिक कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडून ते मंगळवारपासूनच जनसेवेत सक्रिय झाले. कुटुंबवत्सल वरपिता ते जिल्ह्यातील जनतेच्या हितासाठी सदैव दक्ष असलेले संवेदनशील पालकमंत्री, ही शंभूराज देसाई यांची रूपे यानिमित्ताने जिल्हावासियांनी अनुभवली.
मंगळवारी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा प्रशासनातील विविध विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. यावेळी त्यांनी कराड विमानतळाचे विस्तारीकरण व नाइट लँडिंगची कामे, पाटण तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दींमधील पवनचक्क्यांकरिता संबंधित कंपन्यांकडून देण्यात येणाऱ्या कराबाबत आढावा बैठका घेतल्या. तसेच मोरणा गुरेघर व वांग मराठवाडी या प्रकल्पांबाबतही त्यांनी यावेळी आढावा बैठका घेतल्या. याप्रसंगी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच पाटण तालुक्यातील जिंती व निगडे येथील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने त्यांनी आजच्या बैठकीत निर्देश दिले. यावेळी जिल्हा प्रशासनातील संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या पार्श्वभूमीवर, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घरच्या मंगलकार्याच्या व्यस्ततेतूनही वेळ काढत जिल्हावासियांच्या प्रश्नांना प्राधान्य दिल्याने त्यांचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई, यशवंतराव चव्हाण यांच्याप्रमाणे कार्यक्षम आणि कर्तव्यदक्ष पालकमंत्री व नेतृत्व दीर्घ काळानंतर सातारा जिल्ह्यास लाभल्याची भावना नागरिकांकडून यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे.

Comments
Post a Comment